पुण्यात ट्रक चालकांचा अद्याप संप नाही; पुणेकर मात्र पॅनिक ! | पुढारी

पुण्यात ट्रक चालकांचा अद्याप संप नाही; पुणेकर मात्र पॅनिक !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यात कोठेही पेट्रोलचा तुटवडा नाही, मात्र संपाच्या भीतीने पुणेकर पॅनिक झाले असून, पेट्रोल पंपांवर पेट्रोल भरण्यासाठी पुणेकरांच्या वाहनांच्या रांगाच-रांगा लागल्या आहेत. मार्केटयार्ड येथील मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांची आवक दहा ते वीस टक्के कमी झाली असून, याचा परिणाम आगामी काळात भाजीपाल्यांच्या किमतींवर होणार आहे. त्यासोबतच ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने मंगळवारी (दि.2) चार वाजता ऑनलाईन बैठक घेऊन संपाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तोपर्यंत पुण्यात चालकांचा संप नाही. मात्र, बाहेरील जिल्ह्यातील आंदोलनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाच वाजल्यानंतर पुण्यातील संपाचा निर्णय….

पुण्यामध्ये चालकांनी संप करून कायदा हाती घेऊ नये, चालकांच्या मागण्यांसाठी आज आम्ही सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशनची ऑनलाईन बैठक घेणार आहे. त्यानंतरच अंतिम निर्णय घेऊ. तोपर्यंत कोणतीही टोकाचे पाऊल उचलू नये. असे ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे बाबा शिंदे यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

पुण्यात पेट्रोलची स्थिती नॉर्मल….

या संदर्भात पेट्रोल डीलर असोसिएशनचे अली दारूवाला म्हणाले, पुण्यात कोणताही पेट्रोलचा तुटवडा नाही, सर्व ठिकाणी पेट्रोलचा पुरवठा व्यवस्थित करण्यात आला आहे. आता सर्व स्थिती नॉर्मल झाली आहे. त्यामुळे पुणेकरांनी घाबरण्याचे काही कारण नाही. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करू नका.

… तर ट्रॅव्हल बस उभ्या राहतील…

याबाबत पुणे बस असोसिएशनचे कार्याध्यक्ष म्हणाले, शासनाने आणलेल्या या कायद्याबाबतचे अद्याप पर्यंत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. चालकाची चूक आहे ही ठरवणारी यंत्रणा अद्याप पर्यंत शासनाकडेच तयार नाही. राज्यातील सर्व महामार्ग जोपर्यंत सर्व सीसीटीव्हीने पूर्ण होत नाही, तोपर्यंत चालकाची चूक आहे, हे समजणार नाही. कधीकधी कायद्याचा चुकीचा वापर केला जातो. त्यावेळी चालकाची चुकी आहे किंवा नाही हे ठरवणारी यंत्रणा महत्त्वाचे ठरणार आहे. तोपर्यंत शासनाने असा कायदा लागू करू नये. सध्या आमच्याकडील बस वाहतूक सेवा सुरू आहे, मात्र, जोपर्यंत डिझेल पुरवठा आहे तोपर्यंत ती सुरू राहील त्यानंतर आपोआपच आमच्या गाड्या उभ्या राहतील. शासनाने यावर निर्णय घेतला नाही तर आम्ही सुद्धा उद्यापासून संपात सहभागी होणार आहोत.

चार तारखेनंतर आम्ही निर्णय घेऊ

ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे म्हणाले, देशभरात चालकांनी संप पुकारला आहे त्यांनी आपले आंदोलन कायदा व सुव्यवस्था हाती न घेता शांततेच्या मार्गाने सुरू ठेवावे. दिल्लीत सातशे ते आठशे चालकांच्या संघटना एकत्र आल्या आहेत याबाबत लवकरच चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत सर्व चालकांनी आपले आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू ठेवावे. संपाबाबतची भूमिका आम्ही चार तारखेनंतर स्पष्ट करणार आहोत. त्यानंतरच आंदोलनाला दिशा दिली जाईल.

पुणे मार्केटयार्डमध्ये गाड्यांची आवक कम…

पुणे मार्केट यार्ड दररोज साधारणता 1100 ते 1200 गाड्यांची आवक होत असते. आज 900 गाड्यांची आवक झाली. त्यामुळे सुमारे साधारणतः दहा ते वीस टक्के गाड्यांची आवक कमी झालेली आहे, संपाचा परिणाम मार्केट यार्ड येथे पाहायला मिळत आहे. अशीच स्थिती राहिल्यास भाजीपाल्यांच्या किमतींवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

Back to top button