Pune : पाणी चोरणार्‍यांवर कठोर कारवाई करणार | पुढारी

Pune : पाणी चोरणार्‍यांवर कठोर कारवाई करणार

दिवे : पुढारी वृत्तसेवा : दिवे, सोनोरी, वनपुरी, उदाचीवाडी, सिंगापूर, पारगाव या परिसरात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचा बोजवारा उडाला आहे. या पार्श्वभूमीवर लाभधारक शेतकर्‍यांसह आजी-माजी लोकप्रतिनिधींनी या योजनेच्या शाखा अभियंत्यांना त्यांच्या कार्यालयात घेराव घातला. त्यावर पाणी चोरी करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन शाखा अभियंता नीलेश लगड यांनी दिले.

या वेळी दिवे गावचे सरपंच योगेश काळे, सोनोरीचे सरपंच भारत मोरे, देवीदास कामथे, मुरलीधर झेंडे, विशाल लवांडे, मंजूषा गायकवाड व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचा बोजवारा उडाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. विविध गावचे सरपंच व लाभधारक शेतकर्‍यांनी सासवड येथील योजनेच्या कार्यालयात अधिकार्‍यांना घेराव घातला. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी पूर्ण दाबाने पोहचत नाही. मोठ्या प्रमाणात पाणीचोरी होत असल्याकडे लाभधारकांनी अभियंत्यांचे लक्ष वेधले. सध्या एकच पंप सुरू असल्याने पाणीवाटपाचे नियोजन कोलमडले आहे.

तीन दिवस बारामती लाइन व तीन दिवस दिवे लाइन असे नियोजन केले आहे. योजना कधी बंद पडेल याची शाश्वती नाही. अधिकार्‍यांच्या संगनमताने पाणी चोरी सुरू असल्याचा थेट आरोप शेतकर्‍यांनी केला. आमच्याकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी पाणी चोरांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला शाखा अभियंता लगड यांनी दिला. परंतु, या लाइनवरील शेकडो जोडांपैकी काही अधिकृत, तर काही अनधिकृत आहेत. काही जोड चक्क जमिनीखालून अदृश्य आहेत, असे काही शेतकर्‍यांनी सांगितले. शेतकर्‍यांना कोणता व्हॉल्व्ह बंद करायचा हेच समजत नाही. पाणी चोरांवर कायदेशीर कारवाई करावी किंवा कर्मचार्‍यांमार्फत त्यावर लक्ष ठेवावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी घेतली. त्यावर पाणी चोरांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे शाखा अभियंता नीलेश लगड यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button