

शिवनगर: संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे मतदान रविवारी (दि. 22) पार पडले. यामध्ये 88.48 टक्के मतदान झाले. वाढलेल्या मतदानाचा टक्का कुणाला कौल देणार, तर कुणाचा पत्ता गुल करणार, हे मंगळवारी (दि. 24) मतमोजणी दिवशी कळणार आहे.
माळेगाव साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत चौरंगी लढत झाल्याचे चित्र आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निळकंठेश्वर पॅनेल, तावरे गुरू-शिष्यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनेल, ज्येष्ठ नेते खा. शरदचंद्र पवार यांचे बळीराजा सहकार बचाव पॅनेल, कष्टकरी शेतकरी समितीचे पॅनेल आणि अपक्ष आदींनी या निवडणुकीत मोठी रंगत भरली होती. (Latest Pune News)
मतमोजणी अभियांत्रिकी भवनच्या पार्किंगमध्ये होणार
माळेगाव साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक शांततेत पार पाडली आहे. मतमोजणी प्रशासकीय इमारतीच्या आवारातील अभियांत्रिकी भवनाच्या पार्किंगच्या जागेत मंगळवारी (दि. 24) होणार आहे.
निवडणुकीत कोट्यवधी रुपयांचा वापर; तावरे यांचा आरोप
तब्बल 11 हजार लोकांना प्रत्येकी 10 हजार रुपयांनी पैसे वाटप झाले, अशी आम्हाला माहिती मिळाली आहे. माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी कोट्यवधी रुपयांचा वापर करण्यात आला, असा आरोप सहकार बचाव पॅनेलचे सर्वेसर्वा चंद्रराव तावरे यांनी केला. सांगवी येथे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
तावरे म्हणाले, गेली 40 वर्षे आम्ही लोकांमध्ये राहून काम करत आहोत. लोकांचा कल आम्हाला जाणवत आहे. शंभर टक्के आमचा पॅनेल विजयी होईल. पैशापेक्षा प्रेम आणि विश्वास मोठा आहे आणि ते आम्ही संपादन केला आहे. त्यामुळे आम्हाला निवडून येण्याची खात्री आहे. पण, विरोधकांनी मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप केले, हे देखील खरे आहे.