

गणेश खळदकर
पुणे: सरकारी कामकाजापुरत्या मर्यादित असलेल्या विधी क्षेत्रात आता अमर्याद संधी निर्माण झाल्या आहेत. परिणामी, कायद्याचे शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. यंदा 17 हजारांच्या आसपास जागा असलेल्या तीन वर्षे विधी अभ्यासक्रमासाठी तब्बल 74 हजार 621 विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली आहे. तर, पाच वर्षे प्रवेशासाठी 27 हजार 372 विद्यार्थी इच्छुक आहेत. त्यामुळे जीवघेणी स्पर्धा होणार असून, प्रवेशासाठी चुरस वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रांत आता कायद्याचा अभ्यास केलेली व्यक्ती गरजेची असते. त्यामुळे विधी क्षेत्राचा विस्तार वाढत असून, विद्यार्थ्यांची मागणीही दिवसागणिक वाढत आहे. बहुतांश विद्यार्थी कायद्याचे ज्ञान मिळावे, या उद्देशाने जोड शिक्षण म्हणूनही विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. (Latest Pune News)
शिवाय, या क्षेत्रातील विविध करिअरच्या संधींविषयी माहिती मिळाल्यामुळे विधी अभ्यासक्रमांना गेल्या काही वर्षांपासून प्रवेश घेण्याचे प्रमाण वाढत आहे. पदवी अभ्यासक्रम तीन वर्षे (पदवीनंतर) तसेच पाच वर्षे (बारावीनंतर) अशा दोन स्वरूपात घेतला जातो.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलने नुकतेच तीन आणि पाच वर्षे अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले आहेत. तर, महाविद्यालय नोंदणी प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यात म्हणजेच येत्या 30 जूनपर्यंत विधीप्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी दिली आहे.
गेली काही वर्षे मुंबई विद्यापीठासह अन्य विद्यापीठांचे पदवीचे निकाल रखडल्यामुळे विधी प्रवेश प्रक्रियेला उशीर होत असे. परिणामी, संबंधित प्रवेश प्रक्रिया नोव्हेंबर-डिसेंबर महिना उजाडला तरी पूर्ण होत नव्हती. यंदा मात्र जवळपास सर्व विद्यापीठांच्या पदवीचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे तीन वर्षे विधी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण होऊन सप्टेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यातच विधीप्रवेशाची महाविद्यालये सुरू होणार असल्याचे देखील प्राचार्यांनी स्पष्ट केले आहे.
‘विधी’च्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधीच संधी
सिव्हिल, क्रिमिनल, कामगार, कंपनीविषयक कायदे, करविषयक प्रकरणे, आंतरराष्ट्रीयव्यवहार, ग्राहक हक्क संबंधांवर कायदे, को-ऑप. सोसायटी, ट्रस्ट कायदे, वन व पर्यावरणविषयक कायदे, कौटुंबिक कायदे, मेडिको लीगल कायदे, परिवहन अपघात ट्रिब्युनल्स, पेटंट्स मिळवून देणारे व हक्क अबाधित राखणारे, अशी अनेक क्षेत्रे कायदा पदवीधरांना खुणावत आहेत.
डिपार्टमेंट ऑफ आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, पोलिस सेवा, सरकारी अधिकारी, मानवाधिकार कार्यकर्ता, स्वयंसेवी संस्थांमधील कार्यकर्ता, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, पर्यावरणतज्ज्ञ, क्रिमिनोलॉजिस्ट, कायद्यासंबंधित लिखाण करणारा लेखक, बँकर, पेटंट अॅटर्नी, सायबर आदी क्षेत्रांतही वकील अथवा सल्लागार म्हणून काम करण्याची संधी मिळत आहे.