Political News: पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विजय शिवतारे यांचा विजय निश्चित आहे. विरोधकांचा गावागावांत फज्जा उडालेला असून, पुरंदर-हवेलीच्या विकासाचे खरे शिल्पकार शिवतारेच आहेत. विद्यमान आमदारांनी जनतेची 5 वर्षे वाया घालवली, हे लोकांना आता कळून चुकले असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी केले.
कोळविहिरे व वाल्हे परिसरातील वाड्या-वस्त्यांवर आयोजित प्रचार दौर्यात त्या बोलत होत्या. या वेळी महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे, जिल्हाप्रमुख दिलीप यादव, भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश जगताप, माजी सभापती अतुल म्हस्के यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
शिवतारे म्हणाले, या निवडणुकीत पहिल्यांदा असे घडतेय की आमदारांना स्वतःच केलेला एकही प्रकल्प सांगता येत नाही. आमदारांनी विमानतळ, राष्ट्रीय बाजार, गुंजवणी प्रकल्प घालविले किंवा अडवून ठेवले. लोक आमदार कामे करण्यासाठी निवडून देतात.
पुरंदरचा आमदार कामे होऊ नयेत, यासाठी झटत राहिला. जुलै 2020 मध्ये गुंजवणी जलवाहिनीची दिशा बदलली, तेव्हा आमदार संजय जगताप होते आणि राज्यात महविकास आघाडीचे सरकार होते. विमानतळाला याच काळात खो घातला गेला. राष्ट्रीय बाजार नको म्हणून आमदारांची सत्ता असलेल्या निरा मार्केट कमिटीने ठराव केला. हे खोटे असल्यास आमदारांनी जाहीरपणे सांगावे, असे खुले आव्हान शिवतारे यांनी दिले.
भाजप एकदिलाने संजय जगतापांना पाडणार : जगताप
भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश जगताप म्हणाले, आमदारांनी पक्षातून बाहेर गेलेले लोक हाताशी धरून भाजप शिवतारे यांच्याविरोधात असल्याचे चित्र रंगवायला सुरुवात केलेली आहे. याचाच अर्थ त्यांना पराभवाची खात्री झाली आहे. भाजपचे तमाम कार्यकर्ते आमदारांना यंदा घरचा रस्ता दाखवतील, असेही जगताप म्हणाले.