माणुसकी जागवणारी गोष्ट म्हणजे कविता : डॉ.अरुणा ढेरे

माणुसकी जागवणारी गोष्ट म्हणजे कविता : डॉ.अरुणा ढेरे
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सध्याचा काळ व्यक्तींचं, माणसांचं अवमूल्यन करत चाललेला काळ आहे. आजच्या गजबजलेल्या कोलाहलानं, कल्लोळानं, हुल्लडबाजीनं भरलेल्या वास्तवात माणसाच्या बधिर होत चाललेल्या संवेदनांना जाग आणणारी, त्याचं माणूसपण जागं करणारी गोष्ट म्हणजे कविता. माणसाच्या माथ्यावरचं खुजं होत चाललेलं आभाळ पुन्हा उंच नेण्याची शक्ती कवितेतून, साहित्यातूनच मिळेल, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने बालगंधर्व रंगमंदिर (पुणे) येथे राष्ट्रीय मराठी काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या काव्यसंमेलनाचे उद्घाटन डॉ.अरुणा ढेरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी होते. याप्रसंगी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विजय खरे उपस्थित होते. प्रास्ताविक राष्ट्रीय मराठी काव्यसंमेलन समितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी केले.

या काव्यसंमेलनात कवी अरुण म्हात्रे (मुंबई) यांनी मते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची दूर ती गेली तरीही सावली भेटायची, इंद्रजित भालेराव (परभणी) यांनी 'बाप म्हणायचा काढलेली नखं दारात कधीच नको टाकू', कल्पना दुधाळ (उरुळी कांचन) यांनी 'या शहरात जिथं माझ्या पायांची माती गळून पडली तिथं गवत उगवलंय बघा', प्रकाश घोडके (मिरजगाव) यांनी 'तोंड झाकले तरी मन असतेच ना उघडे', सरिता पवार (सिंधुदुर्ग) यांनी 'कोरड्या ठक्क कातळकडांवरील इवल्याशा जिवंत उमाळ्यातून जन्मलेली विहीर', अंजली कुलकर्णी (पुणे) यांनी 'शाळेत चाललाय चित्रकलेचा तास… विषय दिलाय, चित्र खेड्याचे, तसा जुनाच…,' डॉ. संतोष पवार (श्रीरामपूर), डॉ. स्मिता पाटील (मोहोळ), हर्षदा सुंठणकर (बेळगाव), अविनाश भारती (बीड), तुकाराम धांडे (अकोले), प्रा. प्रदीप पाटील (इस्लामपूर), रेवती दाभोळकर (बडोदा), ज्ञानेश्वर तिखे (इंदोर मध्यप्रदेश), भरत दौंडकर (शिक्रापूर), गोव्याच्या हेमंत अय्या यांनी कविता सादर करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सूत्रसंचालन अरुण म्हात्रे यांनी केले. मराठी विभाग प्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे यांनी आभार मानले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news