फसवणूक समजली; पण तोपर्यंत गेले होते 20 लाख | पुढारी

फसवणूक समजली; पण तोपर्यंत गेले होते 20 लाख

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मुंबई नार्कोटिक्स विभागातून बोलत असल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी एका सॉफ्टवेअर अभियंत्याला आपल्या जाळ्यात खेचले. अभियंतादेखील त्यांच्या सांगण्याप्रमाणे बँकेत आरटीजीएस करण्यास गेला. मात्र, बँकेकडून दोन तास थांबण्यास सांगण्यात आले. या वेळी सायबर चोरट्यांनी दोन तास फोन चालू ठेवून इतर कामे करण्यास सांगितले. अभियंत्याच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. त्याने इंटरनेटवर सर्च करून पाहिले तेव्हा आपण सायबर चोरट्यांच्या सापळ्यात अडकल्याचे समजले. मात्र तोपर्यंत त्याने वीस लाख रुपये त्यांच्या हवाली केले होते.

तुम्हाला जर कोणी पार्सलमध्ये ड्रग्ज, पासपोर्ट, डेबिट कार्ड, नार्कोटिक्स विभाग मुंबईच्या नावाने फोनद्वारे धमकावत असेल तर वेळीच सावध व्हा.. अन्यथा पुढील नंबर तुमचादेखील असतो. फेडेक्समधून बोलत असून कार्डचा नंबर वापरून मुंबई ते तैवान असे पार्सल जात आहे. त्यात 5 मुदतबाह्य पासपोर्ट, 5 डेबिट कार्ड, 750 ग्रॅम एमडीएमए ड्रग्स अशा गोष्टी पाठवण्यात येत असून पोलिस क्लियरन्स सर्टिफिकेटसाठी नार्कोटिक्स सेल मुंबईला अंधेरी येथील वर्ग करीत आहे, असे सांगून बँक खात्याची माहिती घेऊन एका अभियंत्याची तब्बल 20 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी कुमठेकर रस्ता येथे राहणार्‍या 37 वर्षीय अभियंत्याने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 6 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत घडली आहे.

सायबर चोरट्यांनी फिर्यादींच्या मोबाईलवर फोन करून फेडेक्समधून बोलत असल्याचे सांगितले. तुमचा आधार नंबर वापरून मुंबई येथून एक पार्सल तैवानला पाठवले असून, तुम्हाला पोलिस क्लियरन्स सर्टिफिकेट घ्यावे लागेल, यासाठी तुमचा फोन अंधेरी येथील नार्कोटिक्स सेलला ट्रान्स्फर करत आहे. यानंतर समोरील व्यक्तीने फिर्यादी यांना सांगितले की, तुम्हाला 3 ते 7 वर्षे शिक्षा होऊ शकते. तसेच सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांना स्काईपवर व्हिडीओ कॉल करायला सांगितला. आधार कार्ड स्क्रीनवरून ठेवून बोलण्यास सांगितले. तसेच तुमचे बँक खाते मनीलाँड्रिंगसाठी वापरण्यात येत असून आम्हाला ट्रान्सजेक्शन करून बघायचे आहे, असे सांगितले. यानंतर सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांच्या कागपत्राचा आधारे 20 लाखांचे कर्ज घेऊन ते आपल्या बँक खात्यावर वळवले. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपाली भुजबळ करत आहेत.

हेही वाचा

Back to top button