पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वेला रेड सिग्नल | पुढारी

पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वेला रेड सिग्नल

स्वप्निल पाटील

सांगली :  पश्चिम महाराष्ट्रातील मंजूर रेल्वेमार्गांना यावर्षीच्या बजेटमध्ये देखील निधी दिला नाही. यामुळे पश्चिम महाराष्ट्राला कोकणशी जोडण्याचे अजून काही वर्षेतरी दिवा स्वप्नच राहणार आहे. निधी न दिल्याने कोल्हापूर-वैभववाडी या महत्वपूर्ण रेल्वेमार्गासह हातकणंगले-इचलकरंजी आणि कराड-चिपळूण या मार्गांसाठी आणखी काही वर्षे प्रतिक्षा करावी लागणार आहे.

कोल्हापूर ते वैभववाडी 107 किलोमीटर, हातकणंगले ते इचलकरंजी 8 किलोमीटर आणि कराड ते चिपळूण या 112 किलोमीटर मार्गासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंजुरी दिली होती. त्यानुसार तिन्ही मार्गाचा सर्वे करून त्याचा डीपीआर देखील तयार आहे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून या मार्गांना केवळ एक हजार रुपयांचा निधी देण्यात येत आहेत.निधीची तरतूद करण्यात येत नसल्याने तिन्ही मार्ग रखडले आहेत.

कोल्हापूर स्थानक हे सध्या टर्मिनन्स आहे. कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार असल्याने कोल्हापूर कोकणशी आणि इचलकरंजी कोल्हापूर, मिरजशी जोडण्यासाठी कोल्हापूर-वैभववाडी, हातकणंगले-इचलकरंजी रेल्वेमार्ग मंजूर आहेत. इचलकरंजीमध्ये मोठ्या प्रमाणात सूतगिरण्या आहेत. येथे निर्माण होणारे कापड देशभरामध्ये जाते. त्यामुळे इचलकरंजीला फास्ट ट्रॅकवर आणण्यासाठी हातकणंगले ते इचलकरंजी या 8 किलोमीटरचा मार्ग मंजूर आहे. मात्र तो गेल्या अनेक वर्षापासून रखडला आहे. यावर्षीच्या बजेटमध्ये देखील याला निधी दिला नाही.

कराड-चिपळूण हा 112 किलोमीटरचा महत्वाचा मार्ग आहे. याचा डीपीआर तयार आहे. परंतु निधीची तरतूद होत नसल्याने तो रखडला आहे. हा रेल्वेमार्ग होणे गरजेचे आहे. पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना यावर्षीच्या बजेटमधून मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु पुणे-मिरज-लोंढा मार्गाच्या दुहेरीकरणाचा निधी वगळता इतर कोणत्याही मार्गाला निधी दिला नाही.

तसेच बजेटमध्ये कोल्हापूर, मिरजमधून कोणतीही नवी रेल्वे सुरू केली नाही. किंवा कोल्हापूर, मिरजपर्यंत कोणत्याही रेल्वेचा विस्तार केलेला नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील प्रवासी संघटनांसह प्रवाशांची घोर निराशा झाली आहे. बजेटनंतर आता देशभरात नव्या वंदे भारत सुरू होणार आहेत. त्यामध्ये कोल्हापूर- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा देखील समावेश आहे. या गाड्या सुरू झाल्यास केवळ पाच ते सहा तासांत मुंबईला पोहोचणे शक्य होणार आहे.

कराड-बेळगाव, कराड-पंढरपूर मार्ग गुंडाळ्यात जमा

रेल्वेकडून कराड-बेळगाव मार्गाचा सर्वे केला होता. परंतु निधी जादा लागणार असल्याने रेल्वेकडून हा मार्ग सध्यातरी गुंडाळल्यात जमा आहे. अपेक्षेपेक्षा अधिक खर्च या रेल्वेमार्गावर होणार असल्याने हा मार्ग होईल की नाही याबाबत देखील शंका आहे. तसेच प्रतीक पाटील केंद्रीय राज्यमंत्री असताना त्यांनी कराड- पंढरपूर मार्ग होण्यासाठी पाठपुरावा केला होता. परंतु हा मार्ग अद्याप सर्वेमध्येच अडकला आहे. त्यामुळे कराड-बेळगाव आणि कराड-पंढरपूर मार्ग गुंडाळ्यात जमा आहे.

Back to top button