दुधाचे दर सातत्याने कमी, पशुखाद्याचे वाढते दर : दूध उत्पादकांची परवड !

दुधाचे दर सातत्याने कमी, पशुखाद्याचे वाढते दर : दूध उत्पादकांची परवड !

राहू : पुढारी वृत्तसेवा : पशुखाद्याचे वाढत असलेले दर, हिरव्या चार्‍याची टंचाई, या पार्श्वभूमीवर दुधाचे दर सातत्याने कमी होत असल्याने दूध उत्पादक शेतकर्‍यांची अवस्था बिकट झाली आहे. सध्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम बंद झाला आहे. त्यामुळे हिरव्या चार्‍याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. कडक उन्हाळ्यामुळे हिरवा चारा मिळणे अवघड झाले आहे. दूध व्यवसायाचा खर्च वाढत असताना सध्या 3.5 फॅटला प्रतिलिटर 25 रुपये इतका दर मिळत आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा दर कमी असल्याने शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली. उन्हाळ्यामध्ये दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात असते. दरही नेहमी चांगला असतो. मात्र, यंदा एप्रिलचा एक आठवडा उलटला तरीही दुधाचे दर वाढलेले नाहीत.

दूध उत्पादकांना कमी पैसे मिळत असले, तरी दूध विक्रीचा दर मात्र मागील सहा महिन्यांपासून कमी झालेला नाही. दूध उत्पादकांना संध्याकाळी सत्रामध्ये वेगळा दर सकाळच्या सत्रामध्ये वेगळा दर मिळत असल्याची माहिती दुग्ध व्यावसायिकांनी दिली. ग्रामीण भागामध्ये शेतीपूरक उद्योग म्हणून अनेक तरुण हा व्यवसाय करीत आहेत. अनेकांनी यात मोठी गुंतवणूक केली आहे. मात्र, सरकारच्या अनास्थेमुळे हा व्यवसाय कोलमडू लागल्याचे चित्र आहे. हा व्यवसाय कोलमडल्यास ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. यापूर्वी जर्सी गायीच्या दुधाला 35 ते 38 रुपये प्रतिलिटर दर मिळत होता. सध्या तो 25 रुपयांवर आला आहे.

सरकारने दूध खरेदी दरात वाढ केली की लगेचच पशुखाद्यांच्या तसेच हिरवा चारा, कडबा आदींचे भावदेखील वाढविले जातात. दूध दर कमी झाल्यानंतर पशुखाद्यांचे दर कमी होत नाहीत. गोळी पेंड एक हजार रुपयांपासून प्रतिबॅग ते दोन हजार रुपये, गहू भुसा 1300, सरकी 1500 ते 1800 असा सध्या दर आहे. दुधाचा दर 25 रुपायांवर आला आहे. दुधाचे दर नियंत्रित करण्यात काही मोठ्या दुग्ध व्यावसायिकांचा समावेश आहे. दुधाचे दर संगनमत करून पाडण्याचे काम संघटितपणे केले जाते. त्यामुळे सरकारचेही काही चालत नाही. तसेच दुधामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. भेसळयुक्त दूध बंद केले, तर दूध उत्पादकांना चांगले दिवस येऊ शकतील, असे दूध उत्पादक शेतकरी प्रदीप सोनवणे यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news