सर्वात तिखट मिरचीचे घेतले पीक! | पुढारी

सर्वात तिखट मिरचीचे घेतले पीक!

वॉशिंग्टन : जगभरात काही मिरच्यांचा लौकिक ‘सर्वात तिखट मिरच्या’ असा आहे. अशा जहाल तिखट मिरच्या खाल्ल्यानंतर जणू काही तोंडातून आणि कानातून धूर निघेल! अमेरिकेत एक अशी व्यक्ती आहे, जिने सर्वात तिखट मिरची पिकवून विश्वविक्रम केलेला आहे. तिखटपणाच्या बाबतीत या मिरचीने जगातील सर्व मिरच्यांना मागे टाकलं आहे. या मिरचीचं नाव आहे ‘पेपर एक्स.’ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्नुसार, या मिरचीचा तिखटपणा सरासरी 26.93 लाख स्कोव्हिल हीट युनिटस् आहे, जो इतर मिरच्यांपेक्षा सर्वात जास्त तिखट आहे. ही केवळ एक मिरची खाल्ली तरी घाम फुटतो आणि डोळ्यांतून-नाकातून पाणी वाहायला लागतं. इतकंच नाही, तर संपूर्ण शरीराला आग लागल्यासारखं वाटतं.

अमेरिकन मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ही मिरची जिला आपण पेपर एक्स म्हणून ओळखतो, ती अमेरिकेच्या पकरबट पेपर कंपनीचे मालक एड करी यांनी पिकवली आहे. एड करी यांनी यूट्यूबच्या माध्यमातून लोकांना आपण पिकवलेल्या जगातील सर्वात तिखट मिरचीबद्दल सांगितलं. एड करी यांनी आपल्या मिरचीची तुलना विन्थ्रॉप विद्यापीठातील दुसर्‍या मिरचीशी केली आहे, जी अत्यंत तिखट असल्याचं म्हटलं जातं. ही मिरचीची वनस्पती नैसर्गिकरीत्या कुठेही आढळत नाही. एड करी यांनी क्रॉस ब्रीडिंगद्वारे या मिरचीचं पीक घेतलं आणि ती वाढवली.

मीडियाशी बोलताना एड करी यांनी सांगितलं की, त्यांनी या मिरचीचं पीक घेण्यासाठी 100 पेक्षा जास्त प्रयोग केले. 10 वर्षांनंतर केलेल्या अथक प्रयत्नांनंतर त्यांचा पेपर एक्स मिरचीचा प्रयोग यशस्वी झाला. याआधी जगातील सर्वात तिखट मिरचीचा रेकॉर्ड कॅरोलिना पेपर नावाच्या मिरचीवर होता. या मिरचीचा तिखटपणा जवळपास 16.41 लाख एसएचयू इतका होता. कॅरोलिना पेपरदेखील खूप तिखट मिरची आहे. 2013 मध्ये, मसालेदारपणाच्या बाबतीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये या मिरचीला स्थान मिळालं. या मिरचीचं उत्पादनदेखील अमेरिकेत घेतलं जातं. ही मिरची स्वीट हबनेरो आणि नागा वाईपर मिरची यांच्यामध्ये क्रॉस करून तयार केली जाते.

Back to top button