थेंबभर पाण्यासाठी आदिवासींची वणवण : ‘जलजीवन’चे अधिकारी, ठेकेदार मालामाल | पुढारी

थेंबभर पाण्यासाठी आदिवासींची वणवण : ‘जलजीवन’चे अधिकारी, ठेकेदार मालामाल

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : घेरा सिंहगड, अतकरवाडी (ता. हवेली) येथे जलजीवन मिशन योजनेंतर्गत 92 लाख रुपयांची निकृष्ट पाणी योजना फसली आहे. त्यामुळे पाणीटंचाईने अतकरवाडी घेरा सिंहगड व परिसरातील दोन हजारांवर रहिवासी हैराण झाले आहेत. निकृष्ट काम करून अधिकारी व ठेकेदार मात्र मालामाल झाल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

तीन वर्षांपूर्वी शासनाने या योजनेत अतकरवाडीच्या डोंगरात पाण्याची टाकी उभारली. खडकवासला धरणावरून जलवाहिनीही टाकली. मात्र, जलवाहिनी सतत फुटत असल्याने टाकीत पाणी गेलेच नाही. त्यामुळे या योजनेचे थेंबभरही पाणी आदिवासी व इतर समाजाला मिळालेले नाही. निविदेप्रमाणे जलवाहिनी टाकलेल्या नाहीत. तीन फूट खोदकाम न करता वर वर खोदकाम करून वेगवेगळ्या आकाराच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. पंप ही कमी क्षमतेचा बसविला आहे.

जिल्हा परिषदेचा गलथान कारभार

या योजनेत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला. गेल्या दोन वर्षांपासून ग्रामस्थ याबाबत पाठपुरावा करत आहेत. मात्र, अद्यापही जिल्हा परिषदेने दखल घेतली नाही. जिल्हा परिषदेच्या गलथान कारभारामुळे आदिवासी महादेव कोळी समाजासह स्थानिक रहिवासी पर्यटकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या कडक उन्हाळा असल्याने पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत महिला, मुले, नागरिक भांडी घेऊन मिळेल तेथून पाणी वाहून आणत आहेत. अतकरवाडी येथील जुन्या योजनेच्या विहिरीत जलजीवन योजनेचे पाणी सोडले जाते. मात्र, जलवाहिनी फुटत असल्याने ग्रामपंचायतही हतबल झाली आहे.

गावातील निकृष्ट दर्जाची जलजीवन योजना फसली आहे. निविदेप्रमाणे काम करण्यात आले नाही. त्यामुळे गावाला पाणी मिळाले नाही. याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. निविदेनुसार कामातील त्रुटी
दूर कराव्यात.

– पांडुरंग सुपेकर, माजी सरपंच, अतकरवाडी

अतकरवाडी पाणी योजनेची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात येणार आहे. याबाबत तातडीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

– के. एन. खरात, उपविभागीय अभियंता, जि. प. पाणीपुरवठा विभाग

हेही वाचा

Back to top button