

बारामती: बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (दि. 9) रोजी झालेल्या लिलावात विविध धान्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. फळे, भाजीपाला यासह मका, गहू, बाजरी, ज्वारी, हरभरा आदी भरडधान्याची आवक होत आहे.
बहुतांश भरडधान्यांचे भाव स्थिर आहेत. बाजार समितीत हायब्रीड ज्वारीची 353 क्विंटल आवक झाली. ज्वारीला किमान 2000, कमाल 2900 आणि सरासरी 2800 रुपये दर मिळाला. गावरान ज्वारीची 235 क्विंटल आवक होऊन किमान 2500, कमाल 3600 आणि सरासरी 3000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. (latest pune news)
तांबड्या मक्याची तब्बल 547 क्विंटल आवक झाली. मक्याला किमान 2001, कमाल 2271 आणि सरासरी 2260 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. याशिवाय लोकवन गव्हाची 423 क्विंटल आवक झाली.
लोकवन गव्हाला किमान 2000, कमाल 2600 आणि सरासरी 2551 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. गेल्या महिन्याभरापासून गव्हाचे भाव स्थिर आहेत. 2189 या गव्हाची 282 क्विंटल आवक झाली. या गव्हाला किमान 2451 कमाल 3000 आणि सरासरी 2700 असा भाव मिळाला.
बाजार समितीत नवीन गहू आणि हरभरा उपलब्ध झाला आहे. खडे गुळाला किमान,कमाल आणि सरासरी 4000 रुपये भाव मिळाला. गुळाच्या किमतीतही साखरे एवढीच वाढ झाली आहे. हायब्रीड बाजरीची 114 क्विंटल आवक होऊन बाजरीला किमान 2000, कमाल 2700 आणि सरासरी 2600 रुपये भाव मिळाला.
महीको बाजारची 74 क्विंटल आवक होऊन यासाठी किमान 2500, कमाल 3200 आणि सरासरी 2800 रुपये भाव मिळाला. गरडा आणि जाडा हरभर्याला पाच हजारापेक्षा जास्त भाव मिळत आहे. गूळ, बाजरी, हरभरा, उडीद, तूर, मूग, मका यांचीही आवक झाली. जळोची उपबाजारात कोथिंबीर, मेथी, गवार,भेंडी, गाजर, मिरची, फ्लावर, दोडका, टोमॅटो, भोपळा, पावटा, राजमा, पुदिना, मुळा, हिरवी मिरची, वाटाणा,शेंग आदी भाज्यांची विक्रमी आवक होत आहे.
भाज्यांना समाधानकारक भाव मिळत आहे. भुईमूग शेंगा, सूर्यफूल, सोयाबीन आदींचीही आवक मोठ्या प्रमाणात होत आहे.भाजीपाल्यांसह फुलांचीही आवक झाली. यामध्ये पासली, ऐश्वर्या येलो, झेंडू, गुलछडी, बोर्डेक्स तुकडा, बिजली, शेवंती, गलांडा, ग्लाडिटर गुलाब, मोगरा आदी फुलांची आवक होत आहे.