पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारताला पाकिस्तानशी संबंध सुधारणे शक्य होईल; मात्र, चीनशी संबंध सुधारण्याचे आव्हान मोठे आहे. चीनशी संबंधांबाबत भारताला खूप काम करावे लागणार आहे. काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी नियंत्रणरेषा हीच आंतरराष्ट्रीय सीमा केली जावी, अशी अपेक्षा 'रॉ'चे माजी संचालक अमरजितसिंह दुलत यांनी व्यक्त केली. केवळ 370 कलम हटवल्यामुळे हा प्रश्न सुटणार नाही, असेही ते म्हणाले. सरहद, पुणेतर्फे 'रॉ' या गुप्तचर विभागाचे माजी संचालक अमरजितसिंह दुलत यांच्याशी संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी 'सरहद'चे संचालक संजय नहार, युवराज शहा, डॉ. शैलेश पगारिया आदी उपस्थित होते. या वेळी काश्मीरमधील 370 कलम हटवल्याची घटना, पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणावपूर्ण संबंध अशा विविध विषयांवर त्यांनी दिलखुलास संवाद साधला.
दुलत म्हणाले, 'जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम हटवल्यानंतर काश्मीर खोर्यात असंतोष, नाराजी पाहायला मिळत आहे. केंद्र शासनाच्या 'मस्क्युलर पॉलिसी'मुळे तरुणांची निदर्शने, दगडफेक, आंदोलने थांबली. मात्र, दहशतवाद संपलेला नाही. पाकिस्तान आणि भारत यांच्यात संवाद सुरू राहिल्यासच दहशतवादाचा बीमोड होऊ शकेल. अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग यांनी यादृष्टीने चांगले प्रयत्न केले.'
पाकिस्तानशी चर्चा कायम ठेवणे आवश्यक आहे; अन्यथा काश्मिरमध्ये गाझासारखी परिस्थिती उदभवू शकते, ही फारुक अब्दुल्ला यांची भीती सार्थ आहे. पाकिस्तानमध्ये नवाझ शरीफ पंतप्रधान झाल्यास संबंध सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न होऊ शकतात. मात्र, या संबंधांवर भारत, पाकिस्तान तसेच अमेरिकेतील निवडणुकांचाही परिणाम होत असतो, याकडे दुलत यांनी लक्ष वेधले.
हेही वाचा