अरे व्वा ! पुणेकर आता होताहेत आंतरराष्ट्रीय वाहनचालक | पुढारी

अरे व्वा ! पुणेकर आता होताहेत आंतरराष्ट्रीय वाहनचालक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : विदेशात वाहन चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या आंतरराष्ट्रीय परवाने वाटपांमध्ये पुण्यात वाढ झाल्याचे समोर आले आहे. यंदा 4 हजार 914 पुणेकरांनी पुण्यातील आरटीओ कार्यालयातून हे परवाने घेतले आहेत. दोन वर्षांत नऊ हजारांहून अधिक नागरिकांनी आंतरराष्ट्रीय परवाना घेतला आहे. वाहन चालविणे आणि त्यातून फिरायला जाणे, हे सर्वांनाच आवडते.

मात्र, त्यात परदेशात वाहन चालविण्याचा आनंद वेगळाच असतो. त्यासोबतच नोकरी, व्यवसायानिमित्त गेलेल्या भारतीय नागरिकांना परदेशात गाडी चालवावी लागते. त्याकरिता भारतातून परदेशात जाणार्‍या नागरिकांना आंतरराष्ट्रीय वाहन परवाना भारतातीलच आरटीओ कार्यालयात घ्यावा लागतो, असाच परवाना घेण्यामध्ये पुणेकरांमध्ये वाढ झाली आहे.

कोणती आहेत आवश्यक कागदपत्रे

पासपोर्ट, व्हिसा, भारतीय वाहन परवाना (लायसन्स), 40 वर्षांपुढील व्यक्ती असल्यास मेडिकल सर्टिफिकीट (फॉर्म 1-ए), दोन पासपोर्ट साईज फोटो.

इथे भरा ऑनलाईन अर्ज

आंतरराष्ट्रीय वाहन परवाना मिळविण्यासाठी प्रथमतः ‘परिवहन डॉट इन’ या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे, मेडिकल प्रमाणपत्र अपलोड करून एक हजार रुपये फी ऑनलाइनच भरावी लागते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुणे आरटीओ कार्यालयातील परवाना विभागात ही कागदपत्रे, (फॉर्म नं. 4 ए, 1 ए) दोन फोटो जमा करावीत. त्या वेळी आरटीओ अधिकारी संबंधित व्यक्तीचे व्हेरिफिकेशन करून त्याला आक वर्षासाठी आंतरराष्ट्रीय वाहन
परवाना देतील.

परदेशातूनही आयडीपीचे नूतनीकरण

नव्या नियमानुसार नागरिकांना थेट परदेशातूनच स्थानिक भारतीय दूतावासातून आंतरराष्ट्रीय परवाना नूतनीकरण करता येणार आहे. ‘परिवहन’ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरून स्थानिक भारतीय दूतावासाकडे द्यावा. अर्जांची छाननी केल्यानंतर भारतातील संबंधित आरटीओ कार्यालयाला याची माहिती देण्यात येते. आरटीओ कार्यालयातील प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्याचे तीन हजार रुपये शुल्क भरल्यावर संबंधित आरटीओकडून परदेशातील पत्त्यावर पोस्टाने नूतनीकरण झालेला आंतरराष्ट्रीय परवाना पाठविण्यात येतो.

पुण्यातून नागरिक परदेशात पर्यटन, नोकरी आणि शिक्षणासाठी जात असतात. त्या वेळी त्यांना तेथे गाडी चालवण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याची आवश्यकता असते. त्याकरिता पुण्यातून यंदा अधिक नागरिकांनी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना घेण्यात आला आहे.

– संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

हेही वाचा

Back to top button