तडका : राष्ट्रीय संकल्प दिन | पुढारी

तडका : राष्ट्रीय संकल्प दिन

वर्षाच्या अखेराची सुरुवात होते, म्हणजे डिसेंबर महिना येतो तेव्हाच अनेक जण वेगवेगळे संकल्प मनोमन तयार करत असतात. संकल्पाला सुरुवात करण्याचा दिवस म्हणजे एक जानेवारी. कॅलेंडर बदलले म्हणजे नवे वर्ष सुरू झाले की, पहिल्या दिवसापासून आपल्याला अमुकतमुक करायचे आहे, याचा निश्चय मनातल्या मनात आधी केला जातो. काय करायचे आहे व काय सोडायचे आहे, हेपण याच दिवशी ठरवायचे असते. कुणाला तंबाखू सोडायची असते, कुणाला धूम—पान सोडायचे असते, कुणाला मद्यपान सोडायचे असते; त्यासाठी उत्तम दिवस म्हणजे एक जानेवारीपासून आपण हे करूयात, असे ठरवणे आहे. सरत्या वर्षामध्ये शुगर, बीपी, कोलेस्टेरॉल इत्यादी व्याधींचे निदान झाले असेल तर डॉक्टर त्यांना सुचवतात की, दररोज सकाळी 45 मिनिटे चालायला सुरुवात करा. मग ही 45 मिनिटे चालण्याची सुरुवात कधी करायची? तर ती एक जानेवारीपासून. त्यामुळेच 31 डिसेंबर या तारखेला ‘राष्ट्रीय संकल्प दिन’ असे म्हणता येईल. संकल्प 31 डिसेंबरला करायचा आणि त्याची अंमलबजावणी एक जानेवारीपासून करायची, हे भारतभर सर्वत्र असेच सुरू असते.

आपण सकाळी 45 मिनिटे चालण्याचे उदाहरण घेऊया. ज्याने हा संकल्प केला आहे, ती व्यक्ती 31 डिसेंबरच्या रात्री स्पोर्टस् शूज, त्याचे सॉक्स आधीच पाहून ठेवते. सकाळी चालताना आरामदायी असावे म्हणून ट्रॅकसूट इत्यादी तयारी करून ठेवतात. एक जानेवारीच्या पहाटे साडेपाच वाजता उठून तयार होऊन अत्यंत उत्साहाने हे लोक फिरायला सुरुवात करतात. त्या व्यक्तीचा हा संकल्प फार काळ टिकणार नाही, हे घरातील सर्व सदस्यांना निश्चित माहीत असते. याची तयारी पाहून घरातील सर्व सदस्य गालातल्या गालात खुदुखुदु हसत असतात. पहिल्या दिवशी फिरून आल्यानंतर सदरील व्यक्ती सकाळी जागे होणे किती चांगले असते, किती स्वच्छ हवा असते, मनाला आणि शरीराला कशी तरतरी येते याविषयी भरभरून बोलायला लागते. पुढील चार-पाच दिवस कोणीही पाहुणा आला तरी, आपण सकाळी साडेपाच वाजता कसे फिरायला जातो याचे सविस्तर वर्णन ऐकवून हे गृहस्थ पाहुण्या मंडळींना सकाळी फिरायला जाण्याचे किती फायदे आहेत आणि त्यामुळे आरोग्य कसे मजबूत राहते याविषयी तासन् तास ऐकवत असतात. असेच पुढे आठ-दहा दिवस जातात आणि मग एके दिवशी सकाळी उठल्याबरोबर आज थंडी आहे; त्यामुळे सकाळचा बेत कॅन्सल, असे ते जाहीर करतात. दुसर्‍या दिवशी पुन्हा फिरायला जातात आणि मग आठवड्यामध्ये फिरायला जाण्याचे प्रमाण सातपैकी दोन दिवसांवर येते. साधारणतः 15 जानेवारी उजाडेपर्यंत हा संकल्प कसाबसा टिकतो आणि 20 जानेवारीपर्यंत पूर्णपणे बारगळलेला असतो.

खाण्यातून वर्ज्य करण्याच्या गोष्टी किंवा असणारी व्यसने, मग भले ते सुपारीचे असो, सोडायचा दिवस ठरलेला आहे. एक जानेवारीपासून बंद म्हणजे बंद. असे संकल्पसुद्धा जेमतेम चार ते पाच जानेवारीपर्यंत टिकतात आणि 10 जानेवारीपर्यंत त्याचा पूर्ण फज्जा उडालेला असतो. यातील गमतीचा भाग म्हणजे चालू वर्ष पुन्हा संपताना पुन:पुन्हा तेच तेच संकल्प केले जातात, त्याच पद्धतीने राबवले जातात आणि तेवढ्याच पद्धतीने ते बारगळत असतात. त्यामुळेच वर्षाच्या शेवटच्या दिवसाला म्हणजे 31 डिसेंबरला राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणायला हरकत नाही.

संबंधित बातम्या

Back to top button