

Pahalgam attack victim : पुणे : काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले कौस्तुभ गनबोटे यांच्या पार्थिवावर पुण्यात शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी त्यांची अंत्ययात्रा सकाळी त्यांच्या अप्पर इंदिरानगर साळवे गार्डन येथील निवासस्थानाहून वैकुंठ स्मशानभूमीपर्यंत निघाली. यावेळी अंत्ययात्रेत त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
काश्मीरमधील पहेलगाम येथील बैसरान खोऱ्यात मंगळवारी पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात पुण्यातील कौस्तुभ गनबोटे यांचा मृत्यू झाला. त्यांना गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास विमानाने पुण्यात आणण्यात आले. सकाळी त्यांचे पार्थिव अप्पर इंदिरानगर येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अंत्यदर्शन घेतले आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) पक्षाचे प्रवक्ता अंकुश काकडे, शिवसेना उबाठा गटाचे वसंत मोरे, काँग्रेसचे अरविंद शिंदे, आम आदमी पार्टीचे एकनाथ ढोले व अन्य उपस्थित राजकीय, सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सकाळी नऊच्या सुमारास अप्पर इंदिरानगर, साळवे गार्डन येथील गनबोटे यांच्या निवासस्थानाहून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. परिहार चौक मार्गे गंगाधाम चौक, मार्केट यार्ड चौक, नंतर सेव्हन लव्हज चौकातून स्वारगेट येथून ना.सी. फडके चौक (निलायम चित्रगृह), शास्त्री रोडने अंत्ययात्रा वैकुंठ स्मशानभूमीपर्यंत झेंडूच्या फुलांनी सजवलेल्या रुग्णवाहिकेतून कडक पोलीस बंदोबस्तात आणण्यात आली. या मार्गावरील चौका-चौकात पोलिसांचा बंदोबस्त होता. तसेच, पार्थिव घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेसमोर पोलिसांच्या पायलेट कारचा ताफा धावत होता. दरम्यान यावेळी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी रुग्णवाहिकेचे अंत्यदर्शन घेत, कौस्तुभ गनबोटे यांना श्रद्धांजली वाहिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी सकाळी अप्पर इंदिरानगर साळवे गार्डन येथे गणपती राहत्या घरी कुटुंबीयांची भेट घेत, अंत्यदर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी त्यांच्या पत्नी संगीता गणबोटे यांच्यासह कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच शरद पवार यांनी त्यांच्या पत्नी संगीता गणबोटे यांच्याशी संवाद देखील साधला. त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती घेत, त्यांना तेथे मिळालेल्या शासकीय मदतीचीही माहिती घेतली.
यावेळी कौस्तुभ यांच्या पत्नी संगीता यांनी घडलेला थरारक प्रसंग सांगत, स्वतःला वाचवण्यासाठी काय काय केले याची माहिती सांगितली. त्या म्हणाल्या, अतिरेक्यांनी आम्हाला मारू नये म्हणून आम्ही पटापटा कपाळाच्या टिकल्या काढून फेकल्या. आणि मग आम्ही सगळे अल्ला हु अकबर.. अल्ला हु अकबर म्हणायला लागलो. मात्र, तरीही त्यांनी पुरुषांना मारले. यावेळी खूपच भीतीचे वातावरण आमच्यासमोर उभे राहिले होते.