

Pahalgam Terror Attack
सातारा : पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागांत सातारा जिल्ह्यातील कोणीही नागरिक अडकले असतील, तर त्यांच्यासाठी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या 02162-232175 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. जम्मू-काश्मीरला गेलेले जिल्ह्यातील 26 पर्यटक सुखरूप आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. सातारा जिल्ह्यातूनही बरेच पर्यटक पर्यटनासाठी जम्मू-काश्मीरला जात असतात. जिल्ह्यातून काश्मीरला गेलेले कराडमधील माधवी कुलकर्णी, महेश कुलकर्णी, श्रीधर क्षीरसागर, वर्षा क्षीरसागर, सुखदा क्षीरसागर व सातार्यातील शरद पवार, विद्या पवार, शिवाजी ढाणे, शीतल ढाणे तसेच हेळगाव (ता. कराड) येथील भरत सूर्यवंशी, अमोल पवार यांच्यासह एकूण 26 पर्यटक सुखरूप आहेत. जिल्ह्यातून काश्मीरला गेलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हास्तरीय व श्रीनगर येथील महत्त्वाचे संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पर्यटकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे यांच्या 9657521122 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच काश्मिरमधील पहेलगाव येथे दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने त्याठिकाणी पर्यटक अडकलेले असल्यास त्याची माहिती नागरिकांना मिळण्यासाठी श्रीनगर येथे हेल्पलाईन स्थापन करण्यात आली आहे. नागरिकांना 0194-2483651, 0194-2463651, 0194-2457543 या क्रमांकावर संपर्क साधता येईल तसेच 7006058623, 7780805144 व 7780938397 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करून माहिती देता येईल. काश्मीरला गेलेल्या पर्यटकांबाबत कोणतीही माहिती असेल तर कळवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.