Water Issue Raigad । वाढत्या पाणीटंचाईमुळे रायगडात टँकर लॉबीची चलती

जिल्ह्यात प्रशासनातर्फे 24 टँकर सुरू; हौसिंग सोसायट्यांमध्येही टँकरना मोठी मागणी
Water Tanker
Water TankerPudhari News Network
Published on
Updated on

अलिबाग : ऊन्हाच्या झळा जसजशा वाढत आहेत तशा पाणीटंचाईच्या झळादेखील तीव्र होत चालल्या आहेत. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडयात रायगडमधील 20 गावे आणि 103 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. यासाठी 24 टँकर वापरले जात आहेत. चैत्र महिन्याच्या शेवटाला वैशाख वणव्याच्या झळा बसू लागल्याने मे महिन्यात टंचाईचे संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे. पाणी टंचाईने नागरीक हैराण असले तरी यामुळे टँकरलॉबीचे उखळ पांढरे होत आहे.

Summary

यावर्षी मार्च महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता जास्त जाणवत असल्याने पाण्याचे बाष्पीभवनही जास्त होत आहे. त्यामुळे येथील पाणवटे, विहिरींनी तळ गाठला आहे. तलावांमध्ये शेवटचा चिखल उरला आहे, धरणे आटू लागली आहेत, अनेक विहिरींवर पाणी योजना घेतल्याने त्या विहिरींची पाणीपातळी खूपच खालावली असल्याने बोअरवेलमधून पाणी येणे बंद झाले आहे. टँकरवाल्यांकडे विकण्यासाठीही पाणी शिल्लक राहिले नसल्याने अ‍ॅडव्हान्स पैसे देऊनही येथील नागरिकांना पाणी मिळत नाही, अशी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.

खाजगी टँकरवाल्यांचा आधार

धरणांची पाणीपातळी खालावली आहे. अलिबागला पाणी पुरवणारे उमटे धरण असो की महाड शहरासह काही गावांची तहान भागवणारे कोथुर्डे धरण असो अनेक धरणांच्या पाण्याने तळ गाठला आहे. हे पाणी पुरेसे नसल्याने नागरीकांना खाजगी टँकरवाल्यांचा आधार घ्यावा लागतो आहे. त्यासाठी टँकरमागे 1 हजार रूपये मोजावे लागत आहेत. पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी सोसायट्यांकडून मागविण्यात येणार्या टँकरच्या संख्येत वाढ झाल्याने तेथील देखभाल खर्चाच्या रकमेतही वाढ झाली आहे. सोसायट्यांच्या पदाधिकार्यांना अधिकच्या रकमेची तरतूद करावी लागत आहे. वापरण्याच्या पाण्याचा 10 हजार लिटरचा एक टँकर 1200 ते 1500 रुपयांना, तर पिण्याच्या पाण्याच्या टँकर तीन हजार रुपयांना मिळतो. त्यामुळे टँकरचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

पाणीटंचाईची दाहकता भीषण

सरकारकडून 20 वाड्या-वस्त्यांमधील 65 हजार 631 नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या सरकारी आकडेवारीपेक्षा जिल्ह्यातील पाणीटंचाईची दाहकता भीषण आहे. जिल्ह्यातील एकाही नगरपालिका हद्दीत पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. शहरांपासून वाड्या-वस्त्यांपर्यंतचे नागरिक पाण्यासाठी व्याकूळ झाले आहेत. त्यामुळे नागरीकांना खाजगी टँकरने पाणी घेण्यावाचून गत्यंतर उरले नाही.

नागरिकांचा बाटलीबंद पाणी विकत घेण्याकडे कल

ग्रामीण भागात लग्नसराईची धूम असल्याने पाण्याचा अतिरिक्त वापर होताना दिसतो आहे. लग्नासाठी येणारया पाहुण्यांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी यजमानांकडून टँकर मागवला जात आहे. त्यासाठी आर्थिक भूर्दंड सोसावा लागतो आहे. यामुळे खासगी टँकरमालकांना मात्र सुगीचे दिवस आले आहेत. टँकरमधून पुरवले जाणारे पाणी नद्या, तळी किंवा अन्यस्त्रोतांतून उपसा करून आणले जाते. ते कितपत शुदध किंवा सुरक्षित आहे याची कुठलीच खात्री दिली जात नाही. टँकरच्या पाण्यापेक्षा बाटलीबंद किंवा जारचे पाणी अधिक सुरक्षित असते. त्यामुळे खिशाला चाट देत अनेकांनी पुढील महिनाभर बाटलीबंद पाणी विकत घेण्याचा मार्ग अवलंबला आहे.

यावर्षी उन्हाचे प्रमाण जास्त होते, त्यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झालेले आहे. त्याचबरोबर एमआयडीसीकडून होणार्‍या पाइपलाइनची डागडुजी सुरु आहे. गाळाने साचलेल्या विहिरी, तलावांची स्वच्छता सुरू आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे प्रमाण थोडे जास्त जाणवत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या वतीने टँकरने पाणी पुरवून नागरिकांची पाण्याची समस्या कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, रायगड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news