भेदूया व्यसनांचा चक्रव्यूह : नशाबाजीचा विळखा; तरुणाईची धूळधाण

भेदूया व्यसनांचा चक्रव्यूह : नशाबाजीचा विळखा; तरुणाईची धूळधाण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्याच्या एआरएआय टेकडीवर ड्रगधुंद अवस्थेत दोन तरुणी सापडल्या, ही काही क्वचित घडणारी घटना नव्हे… तसेच, बातमी वाचून विचार न करता पुढे जावे, अशी तर नव्हेच नव्हे. डोळे उघडून आपण पुण्यात फिरलो, तर व्यसनांच्या आहारी गेलेल्या तरुण-तरुणींचे चिंताजनक प्रमाण आपल्याला आढळून येते. व्यसन म्हणजे तंबाखू-सिगारेट आणि दारू ही पारंपरिक कल्पना कधीच मागे पडली आहे. गांजा, गर्द, चरस, मेफेड्रोन अशा किमती आणि आरोग्याची धूळधाण करण्यात एकापेक्षा एक वरचढ असलेल्या पदार्थांचे सेवन तरुण पिढी करते आहे. काय आहे पुण्याचे चित्र आणि या व्यसनांच्या चक्रव्यूहातून या तरुणांना बाहेर कसे काढायचे, या प्रश्नांची चर्चा आजपासून सुरू करतो आहोत.

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात देशभरातून हजारो विद्यार्थी येत असले, तरी पालकांची भीती नसल्याने अनेकांमध्ये व्यसनाधीनता वाढली आहे. गांजा, अफूपासून ड्रग्जचे सेवन करणारी तरुणाई सर्रास दिसू लागली आहे. पुण्यात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा ताब्यात घेतल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली. व्यसनांच्या चक्रव्यूहातून तरुणाईला बाहेर काढण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी पुढाकार घेण्याची गरज अधोरेखित होत आहे. पुण्यातील दोन तरुणींचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला. यानिमित्ताने व्यसनांचे वाढते प्रमाण आणि त्याला बळी पडणारी तरुणाई यावर विविध स्तरांवर चर्चा झाली.

चूक पालकांची की मुलांची, समाजाची नेमकी भूमिका, यावर मतमतांतरे व्यक्त झाली. व्यसनांच्या या विळख्यावर केवळ चर्वितचर्वण करून चालणार नाही, तर याबाबत काय उपाययोजना करता येतील, या दिशेने प्रयत्न करण्यासाठी आवश्यक पावले उचलावी लागणार आहेत. पुण्यात विमाननगर, कल्याणीनगर, बाणेर, फर्ग्युसन रस्ता, शिवाजीनगर, कॅम्प, सेनापती बापट रस्ता अशा विविध परिसरांमध्ये पबचे जाळे विस्तारले आहे. मध्यरात्री तरुणाईचे अनेक ग्रूप मद्यधुंद अवस्थेत पब, बारमधून बाहेर पडताना दिसतात. आजकाल व्यसनाधीनता 'स्टेटस सिंबॉल' होऊ पाहत आहे. शालेय जीवनातील कडक शिस्तीनंतर महाविद्यालयात मिळालेले मोकळे अवकाश, मित्र-मैत्रिणींची संगत, हटके काहीतरी करून पाहण्याची इच्छा आणि ड्रग्जची सहज उपलब्धता अशा कारणांमुळे व्यसनांचे प्रमाण वाढत चालले आहे.

व्यसनाधीनता का वाढतेय?

जीवनशैलीतील वेगवान बदल, मौजमजेला दिले जाणारे अवास्तव महत्त्व, सुधारलेली आर्थिक परिस्थिती, स्पर्धेच्या युगात टिकून राहण्याचा तणाव, वैयक्तिक स्तरावर येणारे नैराश्य अशा अनेक कारणांमुळे व्यसनाधीनता वाढत असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.
शिक्षणाचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी, आयटी हब अशी अनेक बिरुदे मिरवणारे पुणे शहर आता ड्रग्जच्या रॅकेटमुळे चर्चेत आले आहे. कारखान्यांमध्ये तयार केले जाणारे कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज, ते तरुणाईपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत असलेली साखळी, महाविद्यालयांच्या आजूबाजूचा परिसर, पब, बार अशा ठिकाणी सहज उपलब्ध होणारे ड्रग्ज अशा समस्या मुळापासून संपवण्यासाठी
मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्याची गरजही अधोरेखित होत आहे.

अमली पदार्थ कुठे, किती जप्त

जानेवारी 2023 ते ऑक्टोबर 2023 दरम्यान अमली पदार्थांच्या छोट्या-मोठ्या कारवाईत पुणे पोलिसांनी 17 कोटी 14 लाख 213 रुपयांचे अमली पदार्थ पकडले. ललित पाटील प्रकरणात सुमारे 300 कोटींहून अधिकचे मेफेड्रॉन पुणे, मुंबई, नाशिक पोलिसांनी पकडले होते.
कुरकुंभ येथील अर्थकेम येथील कारवाईत पुणे पोलिसांनी 1856 किलो मेफेड्रॉन पकडले. त्याची किंमत 3600 कोटींहून अधिक आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news