

पुणे: वडगाव जलशुद्धीकरण केंद्राची पाणी शुद्ध करण्याची क्षमता केवळ 250 एमएलडी आहे. उन्हाळा असल्यामुळे 10 ते 15 टक्के पाण्याची मागणी वाढली असून, ही मागणी पूर्ण करण्याची क्षमता या जलशुद्धीकरण केंद्रात नसल्याने या केंद्राद्वारे पाणीपुरवठा होणार्या विविध गावांत रोटेशन पद्धतीने पाणीकपात करण्याची वेळ आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने यावर तोडगा काढला नसल्याने पाणी पुरेसे असतानाही दक्षिण पुण्याला पाणीकपातीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणार्या खडकवासला धरणसाखळीत 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. (Latest Pune News)
आम्ही कोणतीही कपात करण्यास सांगितले नाही, असे स्पष्टीकरण जलसंपदाने दिले आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरण्याचे पत्र महापालिकेला देण्यात आले आहे. मात्र, पाणीकपात करण्याचे कसलेही आदेश दिले नसल्याचे स्पष्टीकरणसुद्धा जलसंपदाने दिले आहे. असे असतानाही केवळ दक्षिण पुण्यातील नागरिकांनाच पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. एकीकडे पुण्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे.
जिवाची लाही लाही होत असताना आता पाणीकपातीला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. वडगाव जलशुद्धीकरण प्रकल्पातून पाणीपुरवठा होणार्या भागात रोटेशन पद्धतीने आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. यासाठी महापालिकेने वेळापत्रक जाहीर केले आहे.
मात्र, वर्षानुवर्षे या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमताच वाढवली नसल्याने उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढली की ती पाणीपुरवठा विभागाला पूर्ण करतायेत नसल्याने दरवर्षी ही पाणीकपात करण्याची वेळ पालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर येते. यावर्षी जानेवारी महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे शहराच्या उपनगरांसह समाविष्ट गावांमधून पाण्याची मागणी वाढली आहे.
महापालिकेकडून पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने उपनगरातील नागरिकांची भिस्त टँकरच्या पाण्यावर वाढली आहे. वडगाव जलशुद्धीकरण प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जाणार्या सिंहगड रस्ता, सहकारनगर, धनकवडी, बालाजीनगर, आंबेगाव पठार, दत्तनगर, संतोषनगर, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक या भागांत पाणीपुरवठ्याच्या वारंवार तक्रारी येत असतात.
मात्र, या भागात पाणीटंचाई निर्माण झाल्याचे कारण देत पाणीपुरवठा विभागाने रोटेशन पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. मात्र, या शुद्धीकरण केंद्राची क्षमता नसल्याने ही कपात करण्यात आली आहे.
नागरीकरण झालेल्या भागांना मिळेना पाणी
वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून होणार्या शुद्ध पाण्याचा पुरवठा हा शहरातील दक्षिण भागाला करण्यात येतो. सिंहगड रस्ता, सहकारनगर, धनकवडी, बालाजीनगर, आंबेगाव पठार, दत्तनगर, संतोषनगर, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक येथे पाणी पुरवले जाते. मात्र, या केंद्राची पाणी शुद्ध करण्याची क्षमता ही केवळ 250 एमएलडी असल्याने मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेल्या या भागात पाणीपुरवठा करता येत नाही.
टँकरने पाणीपुरवठा करण्यासही अडचण
वडगाव जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता कमी असल्याने वाढलेल्या लोकसंख्येला टँकरनेसुद्धा पाणीपुरवठा करताना अडचण येत आहे. टँकरभरणा केंद्रांवर पाणी कमी येत असल्याने वाढलेल्या पाण्याची मागणी पूर्ण करता येत नाही. सध्या शहरात जवळपास दीड लाख टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
10 ते 15 टक्के पाण्याची मागणी वाढली
वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून पाण्याची मागणी वाढली आहे. तब्बल 10 ते 15 टक्क्यांनी ही मागणी वाढली आहे. दरवर्षी ही मागणी उन्हाळ्यात वाढते. त्यामुळे पाण्याचा पुरवठा करताना या केंद्रांवर ताण येत आहे. जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता कमी असल्याने ही वाढलेली मागणी पूर्ण करताना पाणीपुरवठा विभागाच्या नाकीनऊ येत आहे.
राजीव गांधी जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा
वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून राजीव गांधी जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा केला जातो. याची पाइपलाइन ही तळजाई वन विभागाच्या क्षेत्रातून जाते. यामुळे येथील परिसरातही पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळेही काही प्रमाणात पाण्याची मागणी वाढली आहे.
वडगाव जलशुद्धीकरण केंद्रावरील ताण वाढला आहे. त्या तुलनेत पाणी शुद्ध करण्याची क्षमता कमी आहे. समाविष्ट काही गावांना देखील येथून पाणीपुरवठा केला जात असल्याने व वाढलेली मागणी पाहता ही पाणीकपात करण्यात आली आहे. दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याने या कपातीचा फारसा परिणाम नागरिकांवर होणार नाही.
- नंदकिशोर जगताप, प्रमुख पाणीपुरवठा विभाग, महानगरपालिका