पुणे: केंद्राकडून महाराष्ट्रातील विविध रेल्वे प्रकल्पांना गती देण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यात पुणे-लोणावळा तिसरी-चौथी मार्गिका, पुणे-नागपूर वंदेभारत गाडी सुरू करणे, पुणे-अहिल्यानगर, पुणे-नाशिक, इंदौर-मनमाड, जालना-मनमाड नवीन मार्गिकांची कामे, पुणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास आणि परिसरातील स्थानकांचा विस्तार यांच्यासह राज्यातील अनेक रेल्वे प्रकल्पांची कामे लवकरात लवकर मार्गी लावणारआहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
हडपसर (पुणे) ते जोधपूर या नव्या रेल्वे गाडीच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेतली, या प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, दौंड-मनमाड दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. इंदौर-मनमाड, जालना-मनमाड नवीन मार्गिकांची कामे आणि त्यासंदर्भातील कार्यवाही वेगाने सुरू आहेत.
23 हजार 78 रुपयांचे बजेट महाराष्ट्रासाठी देण्यात आले आहे. 1 लाख 73 हजार करोड रुपयांचे रेल्वे प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहेत. 11 वंदेभारत ट्रेन महाराष्ट्रातून धावत आहेत. रेल्वेमध्ये प्रवाशांच्या खानपानासाठी अत्याधुनिक किचनमध्ये बनवण्याचे काम सुरू आहे. 900 किचन तयार होणार आहेत, त्यापैकी 550 आधुनिक किचन तयार करण्यात आलेले आहेत. याचा प्रवासी लाभ घेत आहेत.
पुणे रेल्वे स्थानकाचा विकास टोकियो जंक्शनप्रमाणे करणार
पुणे रेल्वे स्टेशन शहराच्या मध्यभागी आहे. त्यामुळे साहजिकच याचा विस्तार करण्यासाठी जमिन अपुरी पडत आहे. त्यामुळे या स्थानकाचा विकास कसा करायचा, याबाबत आमचे नियोजन सुरू आहे.
टोकियो जंक्शनवर जशा गाड्या फक्त प्रवासी उतरवण्यासाठी थांबतात. तेथे देखभाल दुरूस्तीसाठी गाड्या थांबवता येत नाहीत. त्या तेथुन जवळच असलेल्या स्थानकावर जातात. त्याप्रमाणेच पुणेस्थानकावर देखील नियोजन करण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले आहेत. या सोबतच पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म वाढवण्यात येणार आहे.
त्याकरिता पुणे रेल्वे स्थानकावरील सर्व लाईन प्लॅटफॉर्मसाठी वापरल्या जातील, अन् येथील स्टेबलिंग लाईन आळंदीसह हडपसर, खडकी, शिवाजीनगर या स्थानकांवर स्थलांतरीत केल्या जातील. त्याचा आराखडा तयार झाला आहे. याचे बारीक निरीक्षण आम्ही केले आहे, असे वैष्णव यांनी सांगितले.
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी विशेष प्लॅन...
आगामी काळात नाशिक येथे कुंभमेळा होणार आहे. त्याकरिता देशभरातून लोक येथे येणार आहेत. प्रवाशांच्या वाहतुकीसाठी आम्ही रेल्वेचा प्राथमिक प्लॅन तयार केला आहे. पुढील टप्प्यात याबाबत महाराष्ट्र सरकारशी चर्चा करून कुंभमेळ्यासाठी प्रवासी वाहतुकीचा अंतिम प्लॅन तयार केला जाणार आहे, असे वैष्णव यांनी सांगितले.
पुणे-नाशिक रेल्वेसाठी नवीन मार्गिका
पुणे-नाशिकसाठी नवीन मार्गिका तयार होणार आहे. याचा डीपीआर तयार होत आहे. जीएमआरटी ही 23 देशांचे योगदान असलेली संस्था आहे ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. तिला धक्का लावणे, बरोबर नाही. त्यामुळे पुणे-नाशिक रेल्वेसाठी नवीन मार्गिका तयार केली जाणार आहे. या मार्गिकेला आता जीएमआरटीचा अडथळा नसणार आहे. जीएमआरटीपासून खूप लांबून ही नवीन पुणे-नाशिक मार्गिका जाईल, असे वैष्णव यांनी सांगितले.
पुणे-लोणावळा : मार्गिकेचा डीपीआर तयार
पुणे-लोणावळा तिसर्या-चौथ्या मार्गिकेचे काम वेगाने पुढे जाणार आहे. याचा रेल्वेने डीपीआर तयार केला आहे. या मार्गिकेच्या कामासाठी आता राज्य सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा असून, मंजुरी मिळाल्यावर लगेचच केंद्राच्या कॅबिनेटचीही मान्यता मिळेल, त्यामुळे हा पुणे-लोणावळा तिसर्या चौथ्या मार्गिकेचा रखडलेला प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे, असे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
पुणे- अहिल्यानगर थेट प्रवास करता येणार
पुणे-नगर असा थेट प्रवास करणे, रेल्वे मार्गिका नसल्याने शक्य होत नव्हते. मात्र, आता पुणे-अहिल्यानगर थेट प्रवास शक्य होणार आहे. नवीन लाईनचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला देखील मंजुरी मिळणार आहे. त्याचा डीपीआर तयार करण्यात आला आहे. या मार्गावर डबल लाईन तयार होणार आहे. याचा डीपीआर मी स्वत: पाहिलेला आहे. कमीत कमी जमिनीचा वापर कसा होईल, याचे निर्देश आम्ही अधिकार्यांना दिले आहेत. कारण हा पट्टा औद्योगिक क्षेत्र आहे. येथील जमिनीचा एक एक स्क्वेअर मीटरचा वापर व्हायला हवा, असे अधिकार्यांना सांगितले आहे, असे वैष्णव यांनी सांगितले.
पुणे-नागपूर, पुणे-दिल्ली वंदेभारत धावणार...
अनेक वर्षांपासूनची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्य केली. 70 वर्षांत जे काम झाले नाही, ते काम गेल्या 10 वर्षांत झाले आहे. डबलिंगसह अनेक कामे करण्यात येत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर-पुणे वंदेभारत ट्रेन सुरू करावी, अशी विनंती केली आहे. त्यामुळे या ट्रेन बरोबरच लवकरच पुणे ते दिल्ली वंदे भारत स्लिपर ट्रेन सुरु करणार आहे, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.
पुणे-जोधपूर नवीन गाड्यांचे फायदे
महाराष्ट्र/तामिळनाडू आणि राजस्थानदरम्यान थेट प्रवास होणार
व्यापार आणि वाणिज्य वाढवते, पर्यटन सुलभ करते.
प्रदेशांमधील व्यापार आणि व्यावसायिक संवादाला प्रोत्साहन देते.
प्रवाशांचा, लांब पल्ल्याच्या प्रवाशांचा वेळ आणि श्रम वाचवते.
सांस्कृतिक संबंधांना जवळून जोडते आणि प्रादेशिक एकता वाढवते.