

पुणे: शहराच्या बिबवेवाडी परिसरात दोन गटांमध्ये कोयत्याने मारहाण झालेल्या भीषण हाणामारीचा थरकाप उडवणारा व्हिडीओ पुढे आला आहे. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी (18 एप्रिल) रात्रीच्या सुमारास घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बिबवेवाडीतील एका रस्त्याच्या कडेला दोन गट एकमेकांशी वाद घालत होते. अचानक एका गटातील व्यक्तीने समोरच्या हातून कोयता हिसकावून घेतला आणि त्याच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कोयत्याचा जोरदार वार चुकवण्याचा प्रयत्न करताना एक व्यक्ती पळाला, पण तोल जाऊन खाली पडला. (Latest Pune news)
तरीही हल्लेखोर थांबला नाही. याच झटापटीत दुसर्या गटातील व्यक्तीने कोयता हिसकावून घेऊन पलटवार केला. हल्ला एवढ्यावरच थांबला नाही. एक जण दगड घेऊन धावत आला आणि समोरच्या दिशेने भिरकावला. त्यानंतर काही क्षणांत दोघेही एकमेकांवर दगडफेक करताना दिसतात आणि नंतर तिथून पसार होतात.
चित्रपटात घडावा असा हा प्रकार सुरू वर्दळ पीकअवर्समध्ये असताना सुरू होती. या प्रकारामुळे पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरात कोयत्याच्या वापराने हल्ल्यांच्या घटना सातत्याने वाढत आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा व्हिडीओ टि्वट केला असून, पुण्यातील कोयता गँगवर निशाणा साधला आहे. राज्याचे गृहमंत्री आणि पालकमंत्री यांनी याप्रकरणी लक्ष घालावे अशी विनंती पवार यांनी केली.
संबंधित घटना ही सुमारे पंधरा दिवसांपूर्वीची आहे. याबाबत बिबवेवाडी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. घटनेनंतर तत्काळ या गुन्ह्यातील आरोपी अटक केले असून, सध्या येरवडा जेलमध्ये आहेत.
- धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलिस आयुक्त, वानवडी विभाग