

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे महापालिकेला ऑक्टोबर अखेरपर्यंत साडेचार हजार कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये स्थानिक संस्था करातून (एलबीटी) सर्वाधिक 1 हजार 900 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. पहिल्या सात महिन्यांत गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक उत्पन्न मिळाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
महापालिकेचे 2023-24 या आर्थिक वर्षाचे तब्बल साडेनऊ हजार कोटींचे अंदाजपत्रक आहे. प्रशासकराज असतानाही पालिकेत हे विक्रमी रकमेचे अंदाजपत्रक मांडले गेले आहे. त्यात पहिल्या सात महिन्यांत नक्की किती उत्पन्न मिळाले याचा आढावा आयुक्त विक्रम कुमार यांनी घेतला आहे. त्यानुसार ऑक्टोबर अखेरपर्यंत साडेचार हजार कोटींचे उत्पन्न महापालिकेला मिळाले आहे.
त्यात स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) माध्यमातून सर्वाधिक 1 हजार 900 कोटी, तर त्यापाठोपाठ मिळकत करातून दीड हजार कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. याशिवाय बांधकाम परवानगीच्या माध्यमातून जवळपास नऊशे कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. तर पाणीपट्टीसह इतर माध्यमांतून तीनशे कोटींचे उत्पन्न जमा झाले आहे. गतवर्षी ऑक्टोबर अखेरीसपर्यंत सव्वाचार हजार कोटींचे उत्पन्न मिळाले होते.
यावर्षी हे उत्पन्न गतवर्षीच्या तुलनेत अधिक आहे. दरम्यान सात महिन्यांच्या कालावधीत जवळपास साडेतीन हजार कोटींचा खर्च महसुली आणि विकासकामांवर झाला आहे. तर तब्बल साडेसात हजार कोटींच्या कामांचे आदेश (वर्क ऑर्डर) देण्यात आले असल्याचे प्रशासकिय सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे उर्वरित पाच महिन्यांत महापालिकेला जवळपास पाच हजार कोटींच्या उत्पन्नाचा टप्पा गाठायचा आहे.
हेही वाचा