Pune News : फुकट रेल्वे प्रवास पडला महागात | पुढारी

Pune News : फुकट रेल्वे प्रवास पडला महागात

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गर्दीचा फायदा घेत, रेल्वेगाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणे प्रवाशांना चांगलेच महागात पडले आहे. पुणे रेल्वे विभागाने दिवाळीदरम्यान अवघ्या 16 दिवसांच्या काळात 22 हजार 843 फुकट्या प्रवाशांवर धडक कारवाई केली. त्याद्वारे 1 कोटी 82 लाख 97 हजार 793 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
रेल्वेच्या पुणे विभागात 56 स्थानके आहेत. त्या स्थानकांवरून दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. मात्र, दिवाळी काळात होणार्‍या गर्दीचा फायदा घेत, असंख्य प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. त्यांना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने 1 ते 16 नोव्हेंबर 2023 या कालावधीत तिकीट तपासणीसांमार्फत विशेष तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली होती. त्या मोहिमेनुसार रेल्वे प्रशासनाने ही कारवाई केली आहे. प्रवाशांनी अशा प्रकारे विनातिकीट प्रवास करू नये, असे आवाहन रेल्वे अधिकार्‍यांकडून करण्यात आले आहे.
दिवाळी काळात विनातिकीट प्रवास करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. त्या मोहिमेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. प्रवाशांनी प्रवास करताना तिकीट काढूनच प्रवास करावा; अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
– डॉ. रामदास भिसे, विभागीय वाणिज्य 
व्यवस्थापक तथा जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग
हेही वाचा

Back to top button