पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील एका नामांकित कॉलेजच्या प्राध्यापिकेला सायबर चोरट्यांनी मैत्रीच्या जाळ्यात खेचून विदेशातून गोल्डन वॉच आणि डायमंड ज्वेलरी पाठविल्याचे सांगत साडेचार लाखांचा आर्थिक गंडा घातला. या प्रकरणी मानाजीनगर, नर्हे येथील 32 वर्षीय प्राध्यापिकेने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार जेम्स विल्सन नावाच्या भामट्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्राध्यापिकेचा आणि सायबर चोरट्यांचा समाजमाध्यमांच्या माध्यमातून परिचय झाला होता.
त्या वेळी जेम्स विल्सन नाव सांगणार्याने तो जर्मन ब्रिटिशयन असल्याचे सांगून प्राध्यापिकेला मैत्रीच्या जाळ्यात खेचले. त्यानंतर त्यांना विदेशातून गोल्डन वॉच, गोल्डन चेन, डायमंड ज्वेलरी आणि शूज पाउंडस असे गिफ्ट पाठविल्याचे सांगितले. प्राध्यापिकेलादेखील त्याबाबत विश्वास वाटला. दोन चार दिवसांनंतर त्यांना एका मोबाईलवरून कॉल आला. त्याने सांगितले की, तुमच्या नावाने विदेशातून एक पार्सल आले असून, त्यामध्ये खूप किमती वस्तू आहेत. त्या तुम्हाला सोडवून घेण्यासाठी काही चार्जेस भरावे लागतील. प्राध्यापिकेला ते खरे वाटले.
सायबर चोरट्याने त्यांच्याकडून क्लीअरन्स फी, कस्टम चार्जेस, लोकल फ्लाइट, हॉटेल फूड बिल व मनी लाँडरिंग साइनअप डॉक्युमेंट अशी विविध कारणे सांगून विविध बँक खात्यांवर वेळोवेळी 4 लाख 50 हजार रुपये भरून घेतले. मात्र, त्यानंतर त्यांना ना कोणते गिफ्ट आले, ना दिलेले पैसे परत मिळाले. त्या वेळी त्यांनी हा प्रकार आपल्या घरच्यांच्या कानावर घातला. तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. प्राध्यापिकेने याबाबत सायबर पोलिसांत अर्ज केला होता. त्यानुसार सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास गुन्हे निरीक्षक राजुरकर करीत आहेत.
हे ही वाचा :