

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : वीरश्री मालोजीराजे भोसले यांची गढी व चांदशावली दर्ग्याचे संवर्धन व सुशोभिकरणासंदर्भातील आराखडे वित्त व नियोजन विभागाकडे सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकार्यांना दिल्याची माहिती आमदार दत्तात्रेय भरणे यांनी दिली. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी आमदार भरणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, व्हीसीद्वारे पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.
आमदार भरणे यांनी सांगितले की, पवार यांनी मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे व हजरत चांदशावली बाबांच्या दर्गा परिसराचे हेरिटेज दर्जा पद्धतीने सुशोभिकरण करण्याच्या सूचना केल्या. नव्या पिढीला इतिहास कळावा याबाबत पुरातत्व विभागाकडून माहिती घेऊन त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे सादर करण्याच्या सूचना केल्या. तसेच आवश्यक निधीची उपलब्धता करण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी यांनी आराखडा तयार करून वित्त व नियोजन विभागाकडे सादर करावा याबाबतच्या सूचनाही उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री पवार यांनी या बैठकीप्रसंगी केल्याचे आमदार भरणे यांनी सांगितले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, शिवप्रेमी भारत जामदार,आझाद पठाण, ओंकार साळुंखे हे उपस्थित होते.
हेही वाचा :