पिंपरी : पत्नी आणि मुलांसमोर पोलिसाला मारहाण | पुढारी

पिंपरी : पत्नी आणि मुलांसमोर पोलिसाला मारहाण

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पत्नी आणि मुलांसोबत कारने जात असलेल्या पोलिसाला तिघांनी मिळून बेदम मारहाण करून त्यांच्या कारचे नुकसान केले. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 29) रात्री पावणेदहाच्या सुमारास मुंबई- बंगळुरू महामार्गावर बावधन येथे घडली.
याप्रकरणी राहुल पोपट दडस (33, रा. मरोळ पोलिस कॅम्प, अंधेरी पूर्व, मुंबई) यांनी मंगळवारी (दि. 29) रात्री हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गण्या (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) याच्यासह अन्य दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दडस हे मुंबई पोलिस दलात कार्यरत आहेत.

दरम्यान, मंगळवारी रात्री ते कुटुंबीयांसोबत कारने मुंबईच्या दिशेने जात होते. बावधन येथील वाडा हॉटेलसमोर कारमध्ये जात असलेल्या आरोपींशी त्यांचा किरकोळ वाद झाला. त्या वेळी तिघांनी मिळून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत फिर्यादी यांना बेदम मारहाण केली. फिर्यादी यांच्या पत्नीने आरोपींना ‘मारू नका’, अशी विनवणी केली. तसेच, फिर्यादी यांनीदेखील ‘मी पोलीस आहे, मुंबईला ड्युटीला चाललो आहे, मला मारू नका’, अशी विनंती केली. मात्र, तुझ्यासारखे पोलिस मी कोलतो, असे म्हणून एका आरोपीने फिर्यादी यांना पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली. लाथा बुक्क्याने मारून फिर्यादी यांच्या कारचे नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तपास हिंजवडी पोलिस करीत आहेत.

सर्वसामान्यांचे काय ?
पोलिस असल्याचे सांगूनही कारमध्ये जात असलेल्या तीन टवाळखोरानी त्यांना बेदम मारहाण केली. तसेच, त्याच्या खिशातील पैसेही काढून घेतले. त्या वेळी भेदरलेल्या अवस्थेत फिर्यादी राहुल दडस यांचे कुटुंबीय पाहत होते. पोलिस असूनही त्यांना मारहाण झाल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांची ही अवस्था होत असेल, तर सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

काही तासांच्या आत आरोपी जेरबंद
कुटुंबीयांसोबत जात असलेल्या पोलिसाला मारहाण झाल्याचे समजताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून अवघ्या काही तासांच्या आत पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा :

Kolhapur Politics | माजी आमदार के. पी. पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा, चर्चेला पूर्णविराम

Chandrasekhar Bawankule: ३५० रूपयांचा चहा मिळणाऱ्या हॉटेलमधून गरिबांच्या गोष्टी: चंद्रशेखर बावनकुळे

Back to top button