Pune: महापालिकेच्या जाळ्यात मासळी बाजार

कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेली इमारत अद्यापही वापराविना पडून
Pune News
महापालिकेच्या जाळ्यात मासळी बाजारPudhari
Published on
Updated on

Pune News: महापालिकेचा आरोग्य विभाग, क्षेत्रीय कार्यालय आणि अतिक्रमण विभागाच्या कामात सुसूत्रतेचा अभाव आणि टोलवाटोलवीचा फटका गणेश पेठेतील मासळी बाजाराला बसत आहे. प्रशासनाच्या या कारभारामुळे मासळी व्यावसायिकांना नागझरी नाल्यात व्यवसाय करावा लागत आहे. शिवाय जवळपास 15 कोटी रुपये खर्च करून उभारलेली मासळी बाजाराची इमारत वापराविना धूळ खात पडली आहे.

शहरातील मध्यवर्ती ठिकाण गणेश पेठेत अनेक वर्षांपासून पहाटे पाच ते सायंकाळी सहा या वेळेत किरकोळ आणि होलसेल स्वरूपाचा मासळी बाजार भरतो. महापालिका प्रशासनाने 2012 साली मासळी बाजाराच्या नवीन इमारतीचे काम हाती घेतले. बाजाराच्या इमारतीचे काम हाती घेतल्याने येथील मासळी बाजार शेजारी असलेल्या नागझरी नाल्यात भरण्यास सुरुवात झाली. साधारण 15 कोटी रुपये खर्चाच्या मासळी बाजार इमारतीचे काम 2018 मध्ये पूर्ण झाले.

Pune News
फेरमोजणी नाही, तर केवळ मतदान यंत्रांची तपासणी होणार

या इमारतीमध्ये पार्किंग, त्याच्या वरील मजल्यावर 1 ते 10 गाळे मटण मार्केट, 11 ते 63 गाळे मासळी बाजार, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या इमारतीमधील गाळे मासळी विक्रेते आणि मटण विक्रेत्यांना वाटप करण्यात आले आहेत. यासाठी महापालिकेकडून संबंधित व्यावसायिकांकडून महिन्याला 400 रुपयांप्रमाणे वर्षाचे 5300 रुपये भाडेही आकारले जाते. हे भाडे व्यावसायिकांनी भरलेले आहे.

मासळी व्यावसायिकांनी नवीन इमारतीमध्ये बसण्यास सुरुवात केली. मात्र, तेथील विविध अडीअडचणींमुळे काही दिवसांतच मासळी व्यावसायिकांनी नवीन इमारत सोडून पुन्हा नागझरी नाल्यात बस्तान बसविले. त्यामुळे 15 कोटी रुपये खर्च करून बांधलेली इमारत वापराविना धूळ खात पडून आहे. वापर होत नसल्याने येथील पाण्याचे नळ, लाइटची वायरिंग तुटली असून, इमारतीच्या पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात कचर्‍याचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

सध्या मासळी बाजार दररोज नागझरी नाल्यात भरतो. नाल्यातून वाहणार्‍या पाण्यावर पत्रे, प्लायबूड टाकून त्यावरच व्यवसाय केला जातो. माशांटा वास आणि नाल्यातील पाण्याचा वास, यामुळे विक्रेत्यांसह मासळी घेण्यासाठी जाणार्‍या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मासळी बाजाराचे योग्य ठिकाणी पुनर्वसन व्हावे, अशी मागणी केली जात आहे.

Pune News
...अन् चंद्रकांत पाटील यांनी हात जोडले

या कारणांमुळे होत नाही इमारतीचा वापर

  • इमारतीकडे जाणार्‍या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे.

  • अरुंद रस्त्यावरून मासळीच्या गाड्या इमारतीपर्यंत पोहचू शकत नाहीत.

  • मासळी बाजाराचे गाळे जमिनीच्या समपातळीत नाहीत.

  • गाळ्याकडे जाण्यासाठी पायर्‍या चढाव्या लागतात.

  • मासळीचे ओझे पायर्‍यांवरून घेऊन जाणे शक्य होत नाही.

  • इमारतीमध्ये सांडपाण्याची व्यवस्था नाही.

  • नव्या इमारतीमध्ये पुरेसे पाणी व स्वच्छतागृह नाही.

मासळी व्यावसायिक म्हणतात...

महापालिका प्रशासनाने मासळी बाजाराचे नूतनीकरण करताना व्यावसायिकांच्या सल्ल्यानुसार इमारत बांधली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, जागेचा ताबा सोडल्यानंतर वेगळीच इमारत बांधली. गाळ्यांचा आकार लहान असून, वापरण्यासाठी मोकळी जागा नाही. याशिवाय इमारतीच्या खाली पार्किंग व्यवस्था केली आहे.

पार्किंग व्यवस्था खड्ड्यात असल्याने पाणी साचते. त्यामुळे आम्हाला नाल्यात व्यवसाय करावा लागतो. प्रशासनाने आमचे मार्केट यार्डासारखे गाळ्याजवळ गाड्या येतील असे योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे, असे मत मासळी व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे.

स्मरणपत्रानंतरही कार्यवाही नाही

महापालिकेच्या भवन विभागाने मासळी बाजाराची इमारत बांधून ती आरोग्य विभागाकडे हस्तांतरित केली आहे. आरोग्य विभागाने व्यावसायिकांना गाळ्यांचे वाटपही केले आहे. नवीन इमारतीमध्ये मासळी बाजार सुरू झाला होता. मात्र, या इमारतीकडे येणार्‍या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याने व्यावसायिक पुन्हा नागझरी नाल्यात व्यवसाय करत आहेत.

या इमारतीचा पुन्हा वापर व्हावा, यासाठी आरोग्य विभागाने रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय आणि अतिक्रमण विभागाला वारंवार पत्र दिले आहे. पाच ते सहावेळा स्मरण पत्रही दिले आहे. मात्र, यावर काहीच कार्यवाही केली जात नसल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकार्‍यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news