‘जाणता राजा’ महानाट्याने जिंकली प्रेक्षकांची मने

‘जाणता राजा’ महानाट्याने जिंकली प्रेक्षकांची मने

तळेगाव दाभाडे : माँ साहेब जिजाऊंच्या छत्रछायेखालील बालशिवाजी ते छत्रपती शिवाजी महाराज अशा 50 वर्षांतील शिवइतिहासाचे अनेक प्रसंग दमदारपणे सादर करत येथील कांतीलाल शाह विद्यालयाच्या बालकलाकारांनी उपस्थित हजारो प्रेक्षकांची मने जिंकली. विद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सुमारे 200 विद्यार्थ्यांच्या सहभागातून 'जाणता राजा' बालमहानाट्याचा प्रयोग गुरुवारी सादर करण्यात आला.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून प्रयोगाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ संगीत नाट्यकर्मी सुरेश साखवळकर, प्रतिभा इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दीपक शहा, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, शैलेश शाह, संजय साने, विलास काळोखे, संदीप काकडे तसेच महेश शहा, डॉ. शाळीग्राम भंडारी, प्राचार्य संभाजी मलघे यांच्यासह सुनंदा काकडे, रिटा शाह, नीता शाह आणि डॉ. लीना कश्यप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

विशेष प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंचा सत्कार

मुख्याध्यापिका अनन्या कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका वैशाली शिंदे, व्यवस्थापकीय प्रमुख अर्चना चव्हाण, शीला कुलकर्णी, विजया गवळी, धनश्री देशपांडे, मिताली देशपांडे यांनी संयोजन केले. विशेष प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंचा सत्कार या वेळी करण्यात आला. प्रास्ताविक सुलोचना इंगळे यांनी केले. उषा टोनपी, ज्योती तिकोने यांनी सूत्रसंचालन केले. सांस्कृतिक विभागप्रमुख सारिका तितर यांनी आभार मानले.

शिवराज्याभिषेक सोहळ्यावर फुलांची उधळण

प्रयोगादरम्यान प्रत्यक्ष घोडेस्वारी, बैलगाडी, पालखी आदी प्रवेश आकर्षणाचा विषय ठरले. मंदार खाडे, सुभाष शिरसाट, प्रसाद खुरे, सचिन काळभोर आणि शुभांगी शिरसाट यांनी केलेले दिग्दर्शन, बालकलाकारांचा दमदार अभिनय, उत्कृष्ट नेपथ्य, अंक प्रवेशातील नेटकेपणा आणि अप्रतिम प्रकाश योजनेमुळे 'जाणता राजा'चा हा बालप्रयोग अखेरपर्यंत रंगत गेला. मान्यवरांच्या हस्ते पडद्यामागच्या या कलाकारांचा सन्मान करण्यात आला. शिवराज्याभिषेक प्रसंगी प्रेक्षकांनी फुलांची उधळण करत या कलाविष्कारास दाद दिली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news