भावंडांनी धरली आधुनिकतेची कास; पाणी साठवून फुलशेतीची लागवड
दिवे : पुढारी वृत्तसेवा
पुरंदर तालुक्यातील दिवे गाव हे जरबेरा उत्पादनात अग्रेसर ठरत आहे. येथील असंख्य शेतकरी पॉलिहाऊसच्या माध्यमातून दर्जेदार उत्पादन घेत आहेत. एकंदरीत दिवे गावातील शेतकरी बदलत्या काळानुसार आधुनिकतेची कास धरत असल्याचे दिसत आहे.
दिवेमधील सचिन आणि राहुल झेंडे या भावांनी जरबेरा पिकामध्ये नवनवीन प्रयोग करून अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्या त्यांची प्रयोगशील पॉलिहाऊस शेती परिसरातील शेतकर्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सचिन झेंडे यांनी आपल्या 30 गुंठे क्षेत्रावर जरबेराची लागवड केली आहे. ते जरबेराचे दर्जेदार उत्पादन घेत असून, त्यांच्या फुलांना मार्केटमध्ये विशेष मागणी आहे. त्यांना शेतीत त्यांची पत्नी, आई, भाऊ आणि वहिनी यांची मोलाची साथ मिळत आहे. बुके तयार करण्यासाठी तसेच डेकोरेशन आणि लग्नसमारंभात जरबेराचा वापर केला जातो. अलीकडील काळात जरबेरा फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
पुरंदर तालुका हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. त्यावर मात करण्यासाठी शेततळ्याच्या माध्यमातून पाणी साठवून त्याचा वापर उन्हाळ्यामध्ये ही भावंडे करीत आहेत.
शेतीत सेंद्रिय खतांचा वापर
सध्या पुणे या ठिकाणी जरबेरा फुले विक्रीसाठी पाठविले जात आहेत. तेथून हैदराबाद, बडोदा, अहमदाबाद आणि मुंबई या ठिकाणी विक्रीसाठी पाठविला जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रासायनिक खतांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे शेती करणे जिकिरीचे होऊन बसले आहे. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून जैविक सेंद्रिय खतांचा वापर केला जात आहे. परिणामी, खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. सद्य:स्थितीत जरबेरा फुलांची मागणी वाढली आहे.

