डीजेच्या दणदणाटात गुदमरतोय संस्कृतीचा श्वास; पारंपरिक वाद्य लुप्त होण्याच्या मार्गावर

डीजेच्या दणदणाटात गुदमरतोय संस्कृतीचा श्वास; पारंपरिक वाद्य लुप्त होण्याच्या मार्गावर

कोंढवा : संपूर्ण गाव दणाणून सोडणार्‍या 'डीजे'च्या कर्णकर्कश्श आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्तींच्या जीवाची घालमेल होत आहे. 'डीजे'च्या फॅडमुळे पारंपरिक लोककला लुप्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. गावचे गावपण व संस्कृती टिकविण्यासाठी युवावर्गाने पारंपरिक लोककला जपत 'डीजे'ला ब्रेक लावण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. गावोगावच्या यात्रोत्सवांना सध्या सुरुवात झाली असून, यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. ग्रामदैवतांच्या पालखी मिरवणुका 'डीजे'च्या तालावर निघत आहेत. यामुळे सनई-चौघडा, नगारा, तुतारी, लेजीम, ढोल, ताशा, झांज आदी पारंपरिक वाद्य लुप्त होऊ लागली आहेत.

सध्या गल्लोगल्लीत 'डीजे'चा आवाज घुमू लागला असून, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह विविध आजारांच्या रुग्णांना त्रास होत आहे.'डीजे'च्या कर्णकर्कश्श आवाजमुळे छाती धडधडणे आणि श्वासावरचे नियंत्रण सुटण्याच्या तक्रारी आता समोर येऊ लागल्या आहेत. शास्त्रीय दृष्टिकोन पाहता, या ध्वनिलहरीच्या कंपनामुळे मुक्या प्राण्यांनाही त्रास होत आहे. वाढत्या ध्वनिप्रदूषणामुळे अनेक पक्ष्यांनी नागरी वस्तीतून स्थलांतर केले आहे. पक्ष्यांचे प्रमाण कमी होण्यास 'डीजे'चा दणदणाट हे एक कारण असल्याचे पक्षीतज्ज्ञ सांगत आहेत.

पारंपरिक वादकांवर उपासमारीची वेळ

आज गावांतील तरुणाई 'डीजे'साठी आग्रही असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून येत आहे. यामुळे सनई-चौघडा, नगारा, तुतारी, लेजीम, ढोल, ताशा, झांज आदी पारंपरिक वाद्य लुप्त होत असल्याचे चित्र गेल्या काही वर्षांपासून दिसून येत आहे. यामुळे या वादकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

'डीजे'चे हे होताहेत दुष्परिणाम

1. 'डीजे'च्या कर्णकर्कश्श आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्तींच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम
2. कर्णकर्कश्श आवाजामुळे छाती धडधडणे, श्वासावरचे नियंत्रण सुटणे आणि अस्वस्थ वाटत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी
3. सनई-चौघडा, नगारा, तुतारी, लेजीम, ढोल, ताशा, झांज आदी पारंपरिक वाद्य लुप्त होण्याच्या मार्गावर
4. ध्वनिलहरीच्या कंपनांमुळे मुक्या प्राण्यांनाही त्रास होत असून, अनेक पक्ष्यांनी नागरी वस्तीतून केले स्थलांतर

'डीजे'ची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत आहे. विविध आजार व हवामानातील बदलामुळे ज्येष्ठांसह नागरिकांत आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यात 'डीजे'च्या कर्णकर्कश्श आवाजामुळे आणखी भर पडत आहे. याचा विचार कोणी करताना दिसत नाहीत. डीजेचा आवाज कुठे तरी थांबायला हवा आणि आपली पारंपरिक संस्कृती जपण्यासाठी सर्वांनी पुढे येणे गरजेचे आहे.

-अक्षय शिंदे, सरचिटणीस, भाजप हडपसर विधानसभा मतदारसंघ

नागरिकांचे आरोग्य लक्ष्यात घेता मुळात कोणत्याही कार्यक्रमात 'डीजे'ला परवानगी दिली जात नाही. दिली तरी आयोजकांनी आवाजाच्या मर्यादेचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली जात आहे. डीजेमुळे काही ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत. यामुळे अनेक गावांनी 'डीजे'वर बंद आणली आहे. असाच विचार सर्व गावांमध्ये झाला पाहिजे.

-मानसिंग पाटील, पोलिस निरीक्षक, कोंढवा गुन्हे शाखा

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news