

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अर्थसंकल्पीय अधिसभा येत्या शनिवारी होणार आहे. त्यामुळे विद्यापीठात मोठ्या रकमेच्या विविध फायलींवर काम सुरू असून, विद्यापीठ कर्मचारी त्यात व्यस्त आहेत. तर वादग्रस्त नाटक, कुलसचिवाची पदभरती, प्राध्यापक भरती, अधिष्ठात्यांचा पदभार, परीक्षा विभागाचे कामकाज आदी विषयांवर अधिसभेत खडाजंगी होणार असल्याचे अधिसभा सदस्यांनी स्पष्ट केले आहे. विद्यापीठाच्या शनिवारी होणार्या अधिसभेत विद्यापीठाचे बजेट मंजूर केले जाणार आहे. त्यामुळे सध्या विविध विभागांच्या बैठका सुरू आहेत.
तसेच विद्यापीठाचे नॅक मूल्यांकन करायचे आहे. त्यासाठी तयारी करण्यात येत आहे. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून नियमित अधिष्ठाता विद्यापीठाला नाही. गेल्या आठ महिन्यांपासून प्रभारी कुलसचिवांवर विद्यापीठाचा कारभार सुरू आहे. त्यामुळे अधिसभेत यावर घमासान पाहायला मिळणार आहे. विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात सादर करण्यात आलेल्या नाटकामुळे मोठा वादंग निर्माण झाला होता. विद्यापीठातील संबंधित प्राध्यापकावर कारवाई करावी, अशी मागणी विविध संस्था, संघटना व राजकीय पक्षांकडून करण्यात आली होती. एवढेच नाही, तर काही व्यवस्थापन परिषद सदस्यांनीसुध्दा या घटनेनंतर विद्यापीठाच्या आवारात व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरू होण्यापूर्वी प्रभू श्री रामाच्या घोषणा देत विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये प्रवेश केला. यावर आक्षेप घेणारा प्रस्ताव हर्ष जगताप यांनी अधिसभेत सादर करण्यासाठी विद्यापीठाकडे दिला असून, तो अधिसभेच्या कार्यक्रमपत्रिकेत छापण्यात आला आहे. मात्र, यावरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे. यासह अन्य विषयांवर अधिसभेत चर्चा होणार असल्यामुळे अधिसभा वादळी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाच दिवसांवर विद्यापीठाची अधिसभा येऊन ठेपलेली आहे. यामध्ये अनेक अधिसभा सदस्यांनी खेळाचे, उपकेंद्राचे, प्रशासकीय, कमवा आणि शिका, यासंह अन्य प्रश्न टाकलेले आहेत. तर, विविध प्रस्ताव देखील सादर केले आहेत. परंतु, अद्यापही विद्यापीठाचा अजेंडा अंतिम झाला नाही, तो मंगळवारी संध्याकाळी अंतिम होणार असल्याचे अधिकार्यांनी स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा