Pune University : पुणे विद्यापीठाची अधिसभा ठरणार वादळी

Pune University : पुणे विद्यापीठाची अधिसभा ठरणार वादळी
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : विद्यापीठाच्या आवारात चित्रित करण्यात आलेले रॅप साँग, परीक्षा विभागाकडून प्रसिद्ध केले जाणारे चुकीचे निकाल, विद्यापीठाच्या विभागातील रिक्त पदे, सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे रखडलेले सुशोभिकरण, हत्ती तलाव प्रकल्पाचे रखडलेले सौंदर्यीकरण, या आणि अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर शनिवारी (दि. 28) अधिसभा सदस्य विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारणार आहेत. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आजची ही अधिसभा वादळी ठरणार असल्याचे अधिसभा सदस्यांनी स्पष्ट केले आहे.
विद्यापीठात सकाळी 11 वाजता अधिसभेला सुरुवात होणार आहे. यामध्ये अधिसभा सदस्य आणि विद्यापीठ प्रशासन यांच्यात खडाजंगी होण्याची चिन्हे आहेत.

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत एका वादग्रस्त रॅप साँगचे चित्रीकरण झाले. या वादग्रस्त रॅप साँगच्या चित्रीकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीच्या अहवालाचे काय झाले? याबाबत अधिसभा सदस्य कृष्णा भंडलकर अधिसभेसमोर प्रश्न उपस्थित करणार आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा विभागावर अधिसभेत नेहमीच चर्चा होते. परंतु, अंतर्गत गुण देण्यात निर्माण झालेल्या तांत्रिक कारणांमुळे हजारो विद्यार्थ्यांचे निकाल चुकीच्या पद्धतीने जाहीर करण्यात आले. याबाबत दोषी असणार्‍या प्राध्यापकांवर कारवाई करण्यात आली. परंतु, परीक्षा विभागाकडे पाठपुरावा करूनही अनेक विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला गेला नाही.

त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे अनेक अधिसभा सदस्य प्रचंड नाराज आहेत. त्याचे पडसाद विद्यापीठाच्या अधिसभेत पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे या वेळीही परीक्षा विभागातील अधिकार्‍यांना धारेवर धरल्याचे चित्र दिसणार आहे. विद्यापीठाच्या आवारात सुमारे 50 विभाग आहेत. त्यापैकी 40 विभागांचा कारभार 20 व्यक्तींकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे विद्यापीठाचे शैक्षणिक कामकाज पाहण्यासाठी मनुष्यबळच उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे.

विद्यापीठातील वीस व्यक्तींकडे प्रत्येकी दोन विभागांच्या प्रमुख पदांचा कार्यभार आहे. विद्यापीठातील 384 मंजूर प्राध्यापकांपैकी सुमारे 150 प्राध्यापकच सध्या कार्यरत आहेत. त्यातही 111 पदांच्या भरतीची जाहिरात अद्याप विद्यापीठ प्रशासनाने प्रसिद्ध केलेली नाही. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या विषयावरही अधिसभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या 'कमवा व शिका' योजनेंतर्गत मानधनवाढीचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला असला, तरी त्याची अंमलबजावणी केव्हापासून केली जाणार, विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत दिल्या जाणार्‍या कामांमध्ये सुधारणा केली जाणार की नाही, हा विषय चर्चेसाठी येणार आहे. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण केले जाणार होते. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही, अशा विविध प्रश्नांवर आज विद्यापीठात घमासान होण्याची
शक्यता आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news