आरोग्‍य : प्रसूतीनंतरची काळजी

आरोग्‍य : प्रसूतीनंतरची काळजी

गर्भवती महिलांनी गर्भारपणात आणि प्रसूतीनंतर आपली खास काळजी घेतली पाहिजे. प्रसूतीनंतर 40 दिवसांपर्यंत स्त्रीचे स्नायू अशक्त राहतात. त्यामुळे प्रसूतीनंतर सव्वा महिना स्त्रियांनी खास काळजी घेतली पाहिजे. कारण, आईची प्रकृती चांगली नसेल, तर त्याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होतो.

आहार ः प्रसूतीनंतर सूप आणि हिरव्या पालेभाज्यांचे नियमित सेवन केले पाहिजे. मांसाहार करत असाल तर चिकन सूप, पाया सूप यांचे सेवन केले पाहिजे.

मसाज ः प्रसूतीनंतर मसाज करून घेणे हितकारक असते. कारण गर्भारपणाच्या काळात स्नायूंचा आकार वाढतो, प्रसूतीनंतर स्नायू कमजोर झालेले असतात, त्यामुळे प्रसूतीनंतर मसाज घेणे आवश्यक असते. त्यामुळे बाळ आणि बाळंतीण दोघांनाही मालिश करणे किंवा चोळणे आवश्यक असते.

चांगली झोप ः प्रसूतीनंतर बाळाच्या वेळांनुसार आईला जागावे लागते, दूध पाजावे लागते त्यामुळे आईला पुरेशी झोप मिळतेच असे नाही. त्यामुळे प्रसूतीनंतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आराम करावा, झोप काढावी. बाळाच्या दिनक्रमानुसार बाळंतिणीने आपला दिनक्रम ठेवण्याचा प्रयत्न करावा.

सिझेरियननंतर टाक्यांची काळजी ः सिझेरियन झाल्यानंतर टाके पडतात त्यांची योग्य देखभाल न केल्यास संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यासाठीच स्त्रीने सिझेरियन झाल्यानंतर टाक्यांची योग्य काळजी घेतली पाहिजे. त्याशिवाय सिझेरियन झाल्यानंतर अतिथंड पदार्थ खाऊ नयेत.

मूत्रसंसर्ग ः प्रसूतीनंतर सतत लघवी होत असेल तर ती मासिक पाळीची समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करून नका. कदाचित तो मूत्र संसर्ग असू शकतो. त्यामुळे ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

स्नायूंचा व्यायाम ः बाळाच्या जन्मानंतर आईचे स्वतःकडे दुर्लक्ष होते. स्वतःचे आरोग्य जपणे हेदेखील स्त्रीसाठी महत्त्वाचे असते. त्यामुळे थोडा व्यायामही जरूर करू शकता. व्यायामामुळे थकवा दूर होतो आणि स्वतःला ताजेतवाने राखण्यासाठी ध्यानधारणा करता येते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news