

Dagdusheth Ganpati idol journey from Pune To Thailand
आशिष देशमुख
पुणे: मिस पापचसॉर्न निपा ह्या वीस वर्षांपूर्वी प्रथमच पर्यटक म्हणून थेट थायलंड देशातील फुकेत शहरातून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनास आल्या अन् देहभान हरपून गेल्या. गेली 20 वर्षे त्या दरमहिन्याला फुकेत ते पुणे, असा विमानप्रवास करून दर्शनास येत आहेत.
त्यामुळे त्यांनी आपल्या देशात हुबेहूब दगडूशेठ गणपतीची मूर्ती अन् मंदिर बांधण्याचा संकल्प बोलून दाखविला. तिची श्रध्दा, भक्ती पाहून विश्वस्त मंडळाने अखेर परवानगी दिली अन् चार वर्षांच्या अथक परिश्रमातून मिस निपा यांनी तिच्या देशात दगडूशेठ गणपतीचे विलोभनीय मंदिर साकारले. आपण पुण्यात आहोत की फुकेतमध्ये असा संभ्रम होईल इतके हे मंदिर एकसारखे साकारले आहे.
चेतन लोढा या नावाचे पुण्यातील एक भक्त आहेत. ते दगडूशेठ गणपतीचे निस्सीम भक्त. ते देखील याच बाप्पाच्या सेवेत होते. त्यांची गाठ मिस निपा यांच्यासमवेत वीस वर्षीपूर्वी पडली. त्यांनीच निपा यांना पुण्यातील मंदिरात दर्शनाला आणले. ही घटना साधारणपणे 2005 च्या सुमाराची आहे. मिस निपा यांचा देश, धर्म, भाषा वेगळी असली तरी बाप्पाच्या पहिल्याच दर्शनाने त्या भारावून गेल्या.
पर्यटक म्हणून आलेल्या निपा दर महिन्याला पुण्याची वारी करू लागल्या. आज त्या वारीला वीस वर्षे पूर्ण झाली. बाप्पा तूच माझ्या देशात ये, मी हुबेहूब असेच मंदिर बांधेन, असा विचार तिच्या मनात आला अन् 2022 पासून फुकेत शहरातील समुद्रकिनारी मंदिर बांधण्यास सुरुवात झाली. डिसेंबर 2024 मध्ये भव्य मंदिर साकारले.
पुण्यातून जहाजाने नेली बाप्पांची मूर्ती...
फुकेतमधील मूर्ती ही हुबेहूब पुण्यातील बाप्पांसारखी आहे. ती पुण्यातील नाना इंदारे यांनी साकारली, तर तिचे डोळे हर्षद महामुनी यांनी तयार केले. 700 किलो वजनाची ही मूर्ती डेंटल प्लास्टरपासून तयार क?ण्यात आली.
चाळीस दिवसांचा समुद्री प्रवास करीत जहाजाने ती मूर्ती फुकेतला पोहचली तेव्हा सर्वांच्या मनात धाकधूक होती की मूर्ती सुखरूप असेल ना. ती मूर्ती जशीची तशी होती. तिला जरासुध्दा धक्का लागलेला नाही, हे पाहून मिस निपासह सर्वांनीच बाप्पांचे हात जोडून आभार मानले. तिचे डोळे आनंदाश्रूंनी भरून गेले.
मला वाटते की, श्रीमंत दगडूशेठ गणपती मी शोधला नाही, तर बाप्पाने मला बोलावले. त्यांची दैवी शक्ती समुद्र ओलांडून थायलंडमध्ये माझ्या हृदयाला स्पर्शून गेली. मी पहिल्यांदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला भगवान गणेशाचे जिवंत अस्तित्व म्हणून ऐकले. जेव्हा मी पहिल्यांदा पुण्यातील मंदिर पाहिले तेव्हा मला वाटले की, ही केवळ एक मूर्ती नाही तर एक दैवी ऊर्जा आहे, जी प्रत्येक हृदयाला श्रद्धेच्या जवळ खेचते. मला वाटते की, त्याने मला पुण्याहून फुकेतपर्यंत त्याचे प्रेम आणि उपस्थिती वाहून नेण्यासाठी एक साधन म्हणून निवडले.
- मिस पापचसॉर्न निपा, फुकेत, थायलंड
इथे पुण्यासारखी प्रचंड गर्दी नसली तरी भक्तांच्या मनातली ऊर्जा पुण्यातल्या उत्सवासारखी प्रखर आहे. पुण्याची दिव्यता आता फुकेतमध्ये अनुभवायला मिळते, हेच खरे बाप्पाचे सामर्थ्य आहे. एखादा थाई भक्त बाप्पासमोर हात जोडतो, तेव्हा मला वाटतं, भाषेची गरजच काय? कारण भक्तीची भाषा ही प्रेमाची सार्वत्रिक भाषा आहे.
- चेतन लोढा, फुकेतमध्ये जाऊन मंदिर बांधण्यासाठी मदत करणारे भक्त
कोण आहेत मिस निपा...
मिस निपा या फुकेत शहरातील मोठ्या बांधकाम व्यावसायिक आहेत. त्या दर महिन्याला पुण्यात येऊन बाप्पांचे दर्शन घेऊन जातात. त्यांची वारी गत वीस वर्षांपासून सुरू आहे. त्यांनी पुण्यातील मंदिराच्या सर्व प्रथा, परंपरा आणि धार्मिक शिस्त तेथेही ठेवली आहे.
षोडषोपचारासाठी पंचधातूची 90 किलो वजनाची मूर्तीही त्यांनी तयार करवून घेतली आहे. दिवसांतून चारवेळा पूजा, आरती होते. तेथील भक्तांनी सुरुवातीला सिंगापूरहून हार मागविले. मात्र, काही महिन्यांत त्यांनी फुलांचे हार तयार करण्याची कला आत्मसात केली. दररोज नैवेद्य आरती होते. त्यासाठी पुणे शहरातून तीन पुजारी आणि दोन सेवक असे पाच जण कायमस्वरूपी सेवेत आहेत.
यंदा पहिला गणेशोत्सव...
हे मंदिर डिसेंबर 2024 मध्ये पूर्णत्वास गेले. बाप्पाची प्राणप्रतिष्ठा वे.शा.स. शंतनू भानुसे गुरुजींनी केली. यांनीच अयोध्येतील श्रीराम मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती. यंदा पहिल्या गणेशोत्सवासाठी 21 इंच उंचीची मूर्ती आणली आहे. पाच दिवसांच्या उत्सवानंतर ती फुकेत येथील समुद्रात विसर्जित केली जाईल. या समुद्रात गणपती बाप्पाचे प्रथमच विधिवत विसर्जन होणार आहे.