

Girijataka Ganapati
अमोल गायकवाड, जुन्नर : लेण्याद्री गणपती देवस्थान हे अष्टविनायकांपैकी एक असून डोंगरावर आहे. या गणपतीला गिरीजात्मज असे संबोधले जाते. या डोंगरातील एका लेणीमध्ये असलेल्या प्राचीन शिलालेखात कपिचित्त असा या डोंगराचा उल्लेख आढळून येतो. या लेणी समूहाला गणेश लेणी असेही संबोधले जाते.
पुणे जिल्ह्यातील उत्तरेस ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या जुन्नर तालुक्यातील जुन्नर शहरापासून उत्तरेस ७ किलोमीटर अंतरावर 'श्री क्षेत्र लेण्याद्री' देवस्थान आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगेत कोरलेल्या बुद्धलेण्यांच्या समूहामुळे या डोंगराला 'लेण्याद्री' या नावाने ओळखले जाते. लेण्याद्री येथे पूर्व ते पश्चिम अशा एकूण २८ लेण्या आहेत. त्यापैकी सातव्या क्रमांकाचे कोरीव लेणीत 'श्री गिरीजात्मज' गणेशाचे मंदिर असून मंदिराला एकूण साडेतीनशे पायऱ्या आहेत. मुख्य गाभाऱ्यासमोरील प्रशस्त सभामंडप अथवा विहार असून सभामंडपात कोणत्याही प्रकारचा खांब नाही. तसेच सभामंडपाच्या बाहेर दोन पाण्याच्या टाक्यात असून त्यांस वर्षभर थंड पाणी असते. लेण्याद्री हे संरक्षित स्मारक असून ते भारतीय पुरातत्व विभागाच्या मुंबई मंडळाच्या अखत्यारीत येते.
श्री विनायकाने आपल्या पोटी जन्म घ्यावा, अशी माता पार्वतीची इच्छा होती. म्हणून तिने येथे बारा वर्षे कठोर तप केले. या कालावधीत माता पार्वतीने मातीची मूर्ती करून श्री विनायकाची पूजा व अनन्य भावे सेवा केली. माता पार्वतीच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला 'श्री गणेश' बटुस्वरुपात माता पार्वतीच्या समोर प्रकट झाले.
माया सा भुवनेश्वरी देहाश्रिता सुंदरी। विघ्नेशं सुतमाप्तुकाम संहिता दुष्करम।।
तख्या भूत्प्रकट प्रसन्नवरदो तिष्ठतया। वंदे ह गिरीजात्मज परमजं तं लेखनादिस्थितम।।
अर्थ :- ती मायारूपी जगन्माता, शिवपत्नी पार्वती जिने सौंदर्याला आपल्या देहात आश्रय दिला आहे. जिने पुत्र प्राप्तीसाठी कडक तप केले आणि अखेर श्री गणेशच तिला पुत्र प्राप्त झाला अशा ह्या गिरीजेच्या, पार्वतीच्या पुत्रास लेण्याद्री पर्वतावर स्थानापन्न झालेल्या शिवसुताला माझे वंदन असो.
पुणे ते लेण्याद्री अंतर साधारणतः १०० कि.मी. असून पुणे - नाशिक महामार्गाने नारायणगाव येथून जुन्नरला यावे लागते. मुंबई ते लेण्याद्री साधारणतः १९५ कि.मी. अंतर असून कल्याण- अहिल्यानगर महामार्गाने माळशेज घाट ओलांडल्यानंतर गणेश खिंड अथवा बनकर फाट्यावरून लेण्याद्री येथे पोहचता येते.
श्री गिरीजात्मजाच्या दर्शनासाठी देश-विदेशातून असंख्य भाविक तसेच येथील निसर्गसौंदर्य आणि लेणी समूह आणि त्यावरील कोरीव कामाचा अभ्यास करण्यासाठी अनेक देश- विदेशी पर्यटक येत असतात. येथे येणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना सेवा व सुविधा देण्यासाठी १९५५ मध्ये येथील गोळेगाव येथील ग्रामस्थांनी 'श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टची' स्थापना केली. सध्या ॲड. संजय ढेकणे देवस्थानचे अध्यक्ष आहेत. या देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांना व पर्यटकांना विविध सेवा व सुविधा पुरविल्या जातात. यात प्रामुख्याने अल्पदरात निवास, महाप्रसाद, पिण्याचे शुध्द पाणी, पार्किंग, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे इत्यादी सेवांचा समावेश होतो. देवस्थान ट्रस्टच्या वतीने वर्षभरामध्ये सामाजिक धार्मिक उपक्रमासोबत विविध उत्सव व पारंपरिक सण साजरे केले जातात. यात प्रत्येक महिन्यातील विनायक चतुर्थी व संकष्टी चतुर्थी तसेच अंगारकी संकष्टी चतुर्थी, भाद्रपद महिन्यातील श्री गणेश चतुर्थी उत्सव, माघ महिन्यातील श्री गणेश जयंती उत्सव, अखंड हरिनाम सप्ताह इत्यादी उत्सव साजरे केले जातात.