

पुणे: राज्य परीक्षा परिषदेमार्फत रद्द केलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीचा पेपर आता थेट डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार आहे. परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन घेण्यात येणार, याबाबत राज्य सरकारने निर्णय दिलेला नाही. तसेच, परीक्षा पद्धतीमध्येच आमूलाग्र बदल करणार आहे. त्यासाठी राज्य सरकारची तयारी सुरू असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा रविवारी (दि. २८ जून) आयोजित केली होती. परंतु, २७ जूनलाच भिवंडीत पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पारदर्शकपणे करण्यासाठी तसेच पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी होण्यासाठी नियोजित परीक्षा पुढे ढकलल्याचे परीक्षा परिषदेने जाहीर केले. परंतु, परीक्षा नेमकी कधी होणार, याबाबत परीक्षा परिषदेने कोणतीही माहिती ऑगस्ट महिना संपत आला तरी जाहीर केली नाही. त्यामुळे परीक्षा देणारे साधारण सहा लाखांवर उमेदवार परीक्षा नेमकी कधी होणार, असा प्रश्न उपस्थित करीत आहेत.
यासंदर्भात परीक्षा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य परीक्षा परिषदेने राज्य सरकारला परीक्षा कधी घ्यायची, तसेच परीक्षा ऑफलाइन घ्यावी की ऑनलाइन घ्यावी, यासंदर्भात मार्गदर्शन मागवले आहे. परंतु, यासंदर्भात राज्य सरकारने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्याचबरोबर सध्या विविध परीक्षांचे पेपर फुटत आहेत. त्यामुळे अनेक परीक्षा रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढवलेली आहे. त्यामुळे एकूण परीक्षा धोरणातच आमूलाग्र बदल करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे.
त्यासाठी सरकारी पातळीवर मोठे बदल करण्यात येत आहेत. त्यामुळे सरकारकडून मार्गदर्शन आल्यानंतरच परीक्षा घेण्यात येणार आहे. परंतु, राज्य सरकारने परीक्षेसाठी हिरवा कंदील दाखवल्यानंतर प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षा केंद्रांची निवड अन्य परीक्षांचे वेळापत्रक आदी गोष्टी पाहाव्या लागणार आहेत. त्याचबरोबर सध्या सणांचे दिवस सुरू झाले आहेत. लवकरच गणेशोत्सव आणि त्यानंतर येत असलेला दिवाळीचा सण पाहता टीईटी परीक्षा आता थेट डिसेंबरमध्येच घ्यावी लागणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
परीक्षेची तारीख लवकरच कळवू
शिक्षक पात्रता परीक्षेची अद्ययावत तारीख परीक्षा परिषदेने अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे समाज माध्यमांतील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्यात येऊ नये. टीईटी परीक्षेचा दिनांक तसेच परीक्षा नेमकी कशा पद्धतीने घेतली जाणार आहे, यासंदर्भात अधिकृत माहिती परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असे देखील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.