‘जय श्री राम’च्या जयघोषात दुमदुमली मंदिरे..

‘जय श्री राम’च्या जयघोषात दुमदुमली मंदिरे..
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'सियावर रामचंद्र की जय…', 'पवनसुत हनुमान की जय'चा जयघोष… वैविध्यपूर्ण धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन… प्रभू श्री राम मंदिरांमध्ये दर्शनासाठी झालेली गर्दी अन् मंदिरांमध्ये भक्तांनी स्क्रीनवर थेट प्रक्षेपणाद्वारे पाहिलेला सोहळा… असे भक्तिमय झालेले वातावरण शहरातील श्री राम मंदिरांमध्ये पाहायला मिळाले. अयोध्येतील मंदिरात प्रभू श्री राममूर्तीच्या प्रतिष्ठापनेनिमित्त मंदिरांमध्येही आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सकाळपासूनच मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी झाली आणि सोहळ्यानिमित्त भजन-कीर्तनाच्या कार्यक्रमांसह महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

पुण्यातील श्री राम मंदिरांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अभिषेक, महापूजा, आरतीसह भजन-कीर्तनाचे कार्यक्रम झाले. विद्युतरोषणाईने मंदिरे उजळली होती. भगवे पताके, झेंडे अन् रांगोळ्यांच्या पायघड्यांनी वेगळे वातावरण निर्मिले. दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल होती आणि सायंकाळी मंदिरांमध्ये असंख्य दिवे प्रज्वलित करून दीपोत्सवही साजरा करण्यात आला. मध्यवर्ती पेठांसह उपनगरांतील मंदिरांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

जय श्री रामच्या जयघोषात आणि पुणेकरांनी केलेल्या पुष्पवृष्टीमध्ये पेशवेकालीन तुळशीबाग श्री राम मंदिरात रामराज्याभिषेक सोहळा पार पडला. सोमवारी सकाळपासून रात्रीपर्यंत सलग 12 तास धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम झाले. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त राघवेंद्र तुळशीबागवाले, विश्वस्त भरत तुळशीबागवाले, डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले आदी उपस्थित होते. सोमवारी रामरक्षा स्तोत्रपठणापासून कार्यक्रमांना सुरुवात झाली. रामपंचायतन अभिषेक महाभिषेक व पवमान अभिषेक आणि त्यानंतर श्री राम राज्याभिषेक सोहळा झाला. कीर्तनकार विश्वासबुवा कुलकर्णी यांचे लळिताचे कीर्तन झाले. अयोध्येतील

सोहळा लाइव्ह स्वरूपात पाहण्यासाठी दोन भव्य स्क्रीनची सोयदेखील मंदिर परिसरात केली होती. तसेच, सुधारामायणाची गाणी, स्वरतरंग श्रीराम भक्तिगीते, बालप्रतिभा रामचरणी, कथक नृत्य सादरीकरण झाले. सायंकाळी श्री रामाची पालखी प्रदक्षिणा मंदिरात पार पडली. राम-लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की, जय श्री रामच्या जयघोषात कारसेवकांनी अयोध्येत केलेल्या अभूतपूर्व कार्याचा श्री राम अभिमन्यू गणेश मंडळ आणि चव्हाण श्री राम मंदिरातर्फे गौरव करण्यात आला. त्यापूर्वी तेजश्री वाभुळगावकर यांचे 'राष्ट्रनिष्ठा आणि श्री रामजन्मभूमी विजयकथा' या विषयावर कीर्तन झाले.

 हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news