

ओतूर: अणे-माळशेज पट्ट्यात गेली दोन दिवस धुवाधार पाऊस कोसळला. यामुळे पिंपळगाव जोगा धरण पूर्ण क्षमतेने भरले. पुष्पावती नदीत मोठ्या प्रमाणात प्रशासनाने पाणी सोडल्याने नदीच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात नदीचे पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सोमवारी (दि. 29) डिंगोरे व पिंपळगाव जोगा येथे जुन्नरचे तहसीलदार डॉ. सुनील शेळके व तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी इतर नुकसान झालेल्या शेतपिकांची व दाजी मारुती हांडे यांच्या शेतावर जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली. तसेच डिंगोरे येथील शेतकरी अथर्व शेरकर यांच्या टोमॅटो शेतीची पाहणी केली.
खामुंडी येथील शेतकरी अनिल बोडके म्हणाले, माझे अद्यापपर्यंत एकूण सुमारे 35 लाखांपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झालेले आहे. यंदा मे महिन्यापासून पाऊस चालूच आहे, उन्हाळी बाजरी, धना, मेथी पिकांचे त्या काळात नुकसान झाले आहे. त्यानंतरही शेतकरी हरला नाही.
पुन्हा उभारी धरून सोयाबीन पिकाची पेरणी केली; मात्र हुमणी रोगाच्या प्रादुर्भावाने सोयाबीनचे आधीच मोठे नुकसान सोसावे लागले. उर्वरित सोयाबीन काढणीस आले. परंतु सद्य:स्थितीत सोयाबीनच्या शेतात वारेमाप पाऊस झाल्याने शेतात पाणी साठून आता ते देखील वाया जाणार आहे. त्याशिवाय बाजारभावाअभावी चाळीत साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडला आहे. कांदा चाळीतील कांद्याना मोड येऊ लागले आहेत.
खामुंडी परिसरात काही प्रमाणात नवीन कांदा लागवड झालेली आहे. लागवड केलेल्या कांद्यातही पावसाचे पाणी साठल्याने तोदेखील संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे. खामुंडी परिसरातही शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने येथील नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची मागणी श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संदीप गंभीर व सामाजिक कार्यकर्ते कैलास बोडके, अनिल बोडके यांनी केली आहे.