

वडगाव शेरी: नगर रोड-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील मुख्य चौकात बांबूचे सांगाडे लावून आणि पथदिव्यावर अनधिकृत जाहिरात फलक लावले होते. प्रशासनाने या फ्लेक्सवर कारवाई सुरू केली आहे.
शास्त्रीनगरमधील फ्लेक्स आणि बांबूचे सांगाडे काढले. लवकरच इतर ठिकाणचे फ्लेक्स काढणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नगर रोड-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात नवीन बांधकाम, नवीन उद्योग, व्यवसाय आणि राजकीय कार्यकर्त्यांनी फ्लेक्स लावले होते. तसेच, चौका-चौकांत बांबूचे सांगाडे फ्लेक्ससाठी उभे केले होते. यासंदर्भात नागरिकांना लेखी तसेच पीएमसी केअरवर तक्रार केली होती. (Latest Pune News)
फ्लेक्सवर कारवाई करावी, यासाठी मोहल्ला कमिटीच्या बैठकीत अनेक जणांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीनंतर प्रशासनाने फ्लेक्स काढण्यास सुरुवात केली आहे. याबाबत नगर रोड-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाचे आकाशचिन्ह अधिकारी गणेश भारती यांनी सांगितले की, अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांच्या मालमत्तेतून दंड वसूल करणार आहे. अनधिकृत फ्लेक्सप्रकरणी पोलिस चौकीत तक्रार केली आहे. अनधिकृत फ्लेक्स काढण्यास सुरुवात केली आहे. अनधिकृत फ्लेक्सप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
फ्लेक्सवर कारवाई न करण्यासाठी राजकीय दबाव
नगर रोड-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत राजकीय नेत्यांसह व्यावसायिकांनी बांबूचे सांगाडे लावून फ्लेक्स उभे केले आहेत. या फ्लेक्सवर कारवाई करू नये. यासाठी राजकीय दबाव आणला जात आहे. या राजकीय दबावामुळे फ्लेक्सवरील कारवाई संथगतीने होत आहे.