

पौड : पुणे ते कोलाड महामार्गावरील ताम्हिणी घाटात पहिल्याच वळणावर दोन गाड्या खोल दरीत पडून सात नागरिकांचा जीव गेला. या घटनेला पाच ते सहा महिने लोटूनही या वळणावर कोणतीही भिंत किंवा रेलिंग न केल्याने येथे पुन्हा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. अजून किती जीव जाण्याची वाट राज्य रस्ते विकास महामंडळ बघत आहे? असा सवाल वाहनचालकांनी केला आहे.
पुण्यातील कोंढवे धावडे व कोपरे परिसरातील सहा जीवलग मित्र नोव्हेंबर महिन्यात थार गाडीने कोकणात फिरायला चालले होते. मात्र, ताम्हिणी घाटात पुण्याकडून कोलाडकडे जाणाऱ्या मार्गावर कोंडेथर गावच्या पुढे असलेल्या अवघड वळणावर थार गाडी थेट तीनशे फूट खोल दरीत पडली. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला. यानंतर एक महिन्याने अशाच पद्धतीने अपघात होऊन या वळणावरून थेट दरीत जात एकाचा मृत्यू झाला. या अवघड वळणार झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत सात तरुणांचा बळी गेला आहे.
पुण्याहून पौड ताम्हिणी घाटमार्गे कोकणात जाण्यासाठी मोठी वाहतूक वाढली आहे. चांदणी चौक ते कोलाड किंवा माणगाव हा रस्ता चांगला झाल्याने वाहनचालक ताम्हिणी घाटमार्गे कोकणात जाण्यास प्राधान्य देत आहेत. परंतु, घाटातील या पहिल्याच वळणावर धोकादायक स्थिती निर्माण झाल्याने तेथे मोठी भिंत बांधणे गरजेचे आहे. जेणेकरून येथे वळणावर गाडीवरचा चालकाचा ताबा सुटला, तरी गाडी भिंतीला धडकून थांबू शकेल; अन्यथा थेट दरीत गाडी कोसळून नागरिकांचे बळी जाण्याचे सत्र सुरूच राहील.
ताम्हिणी घाटात ज्या वळणावरून जीप दरीत कोसळली तेथील रस्त्याकडेचे लोखंडी संरक्षक कठडे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांतच तुटलेले आहेत, असे काही वाहनचालकांनी सांगितले. कोंडेथर गावच्या पुढे ताम्हिणी घाटात यू आकाराच्या वळणावर रात्री अपघातग््रास्त वाहन संरक्षक कठडेच नसल्याने कसल्याही अडथळ्याविना थेट दरीत कोसळते.
डोंगरवाडी गावच्या अलीकडे मोठ्या पाइपशेजारीही खोल दरी आहे. या ठिकाणी खासगी हॉटेलचालकासाठी संबंधित ठेकेदाराने येथे रेलिंग न करता बाजूला रेंलिग केले आहे. या ठिकाणी पर्यटक फोटोसाठी मोठी गर्दी करतात. रात्री येथेही गाडी थेट दरीत जाण्याची शक्यता आहे. येथे रेलिंग किंवा भिंत बांधण्याची गरज असल्याचे वाहनचालकांनी सांगितले.
ताम्हिणी घाट पौडपासून पन्नास, तर माणगावपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी एखादी घटना घडल्यास या ठिकाणी पोलिस, आपत्ती व्यवस्थापन किंवा रुग्णवाहिका पोहोचण्यास उशीर लागतो. यासाठी घाटमाथ्यावर पोलिस चौकी व रुग्णवाहिका असणे गरजेचे आहे.