

पुणे : आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातील युतीसंदर्भातील बैठक रविवारी (दि. १४) पार पडली.
ही बैठक शिवसेना ठाकरे गटाच्या डेक्कन जिमखाना येथील कार्यालयात झाली. या बैठकीत जागा वाटपाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. पक्षाच्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार ही प्राथमिक बैठक घेण्यात आल्याचे दोन्ही पक्षांच्या वतीने सांगण्यात आले. यासंदर्भातील पुढील बैठक मंगळवारी (दि. १६) मनसेच्या शहर कार्यालयात होणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांनी दिली.
ठाकरे गटाच्या वतीने माजी नगरसेवक वसंत मोरे, प्रशांत बधे, तर मनसेकडून शहराध्यक्ष साईनाथ बाबर, महापालिकेचे माजी गटनेते बाबू वागस्कर, किशोर शिंदे, बाळा शेडगे, हेमंत संभूस उपस्थित होते. दरम्यान, सोमवारी (दि. १५) काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीची बैठक होणार असून, या बैठकीला मनसे उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
शहरात कोणता उमेदवार कुठल्या प्रभागातून उभा राहणार, याची प्राथमिक तयारी झाली असून, दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांनी चांगली तयारी केल्याचे सांगण्यात आले. या बैठकीत जागांविषयी चर्चा झाली नसून, पुढील बैठकीत जागावाटपावर चर्चा होणार आहे. मंगळवारी मनसे कार्यालयात बैठक होईल. त्यानंतर बुधवारपासून जागांबाबत सविस्तर चर्चा सुरू होणार आहे. पुढील दोन ते चार दिवसांत शिवसेना ठाकरे गटाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील, तसेच जागावाटपाची तयारी सुरू राहील. पुढील पावले कशी व केव्हा उचलायची, याबाबत वरिष्ठांनी सूचना दिल्याचेही सांगण्यात आले. याच दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती शहरप्रमुख संजय मोरे यांनी दिली.