पौड : मुळशी तालुक्यात खांबोली येथील तलाव येथे पर्यटनासाठी आलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ओजस आनंद कठापुरकर (वय २२, रा. प्राधिकरण निगडी, पुणे) आणि राज संभाजी पाटील (वय २२, रा. अमळनेर जळगाव) अशी दोन मृतांची नावे आहेत. ही घटना रविवारी (दि. २०) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, फर्ग्युसन कॉलेज येथे शिकणारे आदेश राजेंद्र भिडे, सुमेध सतीश जोशी, प्रशांत संभाजी आरगडे, तेजस्विनी साहेबराव पवार, निधी सत्यनारायण हळदंडकर, तृप्ती चंद्रकांत देशमुख, चैतन्या जयंत कांबळे, ओजस आनंद कठापुरकर आणि राज संभाजी पाटील हे नऊ जण दुचाकीवरून खांबोली तलावाजवळ फिरण्यासाठी रविवारी सकाळी साडेनऊ वाजता आले होते. हे सर्व पाण्यात उतरले होते. यावेळी ओजस आणि राज गाळात अडकले तर उर्वरित पाण्यातून बाहेर आहे. ओजस आनंद कठापुरकर याला पाण्यातून बाहेर काढले असता स्थानिक डाँक्टरांनी त्याला जागेवरच मृत झाल्याची घोषित केले. तर राज संभाजी पाटील याचा अग्निशामक दलाच्या जवानानी शोध घेतला असता काही वेळाने त्याचाही मृतदेह मिळून आला.
यावेळी पौडचे पोलिस संतोष गिरीगोसावी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पोलिस हवालादार रविद्र नागटिळक, ईश्वर काळे, अमोल सूर्यवंशी, अग्नीशामकचे जवान व ग्रामस्थ यांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदत केली. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पौड ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास पौड पोलिस करत आहे.