Talathi Exam : तलाठी परीक्षेचा निकाल डिसेंबरमध्ये

Talathi Exam : तलाठी परीक्षेचा निकाल डिसेंबरमध्ये
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या तलाठी भरती परीक्षेचा निकाल डिसेंबरमध्ये जाहीर करून नव्या वर्षात प्रजासत्ताकदिनी नवनियुक्त तलाठ्यांना नियुक्तिपत्रे देण्याचा भूमिअभिलेख विभागाचा मानस आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. राज्यभरातील ज्या उमेदवारांनी तलाठी भरती परीक्षा दिली, त्यांना 'अ‍ॅन्सर की' पाहून त्यावर हरकती घेण्यास दिलेली मुदत 8 ऑक्टोबरला संपली. प्राप्त हरकतींची तपासणी करून योग्य हरकतींना 3 नोव्हेंबरपर्यंत उत्तर दिले जाणार आहे.

तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती 4466 जागांसाठी 10 लाख 41 हजार 713 असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख 64 हजार 960 उमेदवारांनी परीक्षा दिली. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार 17 ते 22 ऑगस्ट पहिला टप्पा, 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दुसरा टप्पा आणि 4 ते 14 सप्टेंबर असे तीन टप्पे करण्यात आले होते. एकूण परीक्षेची 57 सत्रे झाली.

परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांना उत्तरपत्रिका पाहण्याची आणि त्यावर काही हरकती असल्यास त्या नोंदविण्याची सुविधा दिली होती. ही मुदत आता संपली आहे. प्राप्त हरकती परीक्षा घेणार्‍या टीसीएस कंपनीकडून एकत्रित केल्या जात आहेत. प्रत्येक सत्राला वेगळी प्रश्नपत्रिका देण्यात आली होती. त्यामुळे नेमक्या किती हरकती प्राप्त झाल्या, याबाबत टीसीएसकडून पुढील आठवड्यात माहिती प्राप्त होणार आहे. त्यापैकी योग्य हरकतींचे 3 नोव्हेंबरपर्यंत निराकरण केले जाणार आहे. तसेच हरकत योग्य असल्यास संबंधित सत्रातील उत्तरतालिका बदलण्यात येणार आहे, अशी माहिती अप्पर जमाबंदी आयुक्त आणि तलाठी भरती परीक्षेचे समन्वयक आनंद रायते यांनी दिली.

दरम्यान, ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर परीक्षा दिलेल्या उमेदवारांचा 15 डिसेंबरपर्यंत निकाल जाहीर करण्याचे नियोजन आहे. जिल्हा, जातनिहाय प्रत्येक जिल्ह्याची निवड यादी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. याबाबत वेळोवेळी टीसीएस कंपनीकडून भूमिअभिलेख विभागाला आणि विभागाकडून राज्य शासनाला माहिती दिली जाणार आहे. 26 जानेवारी 2024 रोजी नवनियुक्त तलाठ्यांना नियुक्तिपत्रे देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news