

Pune Sadashiv Peth Fire Incident: पुणे शहरातील मध्यवर्ती आणि अत्यंत वर्दळीच्या सदाशिव पेठ परिसरात आज सकाळी आग लागली. रमेश डाईंग इमारतीच्या टेरेसवर अचानक भीषण आग लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते. परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर धूर पाहताच तात्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली. काही मिनिटांतच अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली.
प्राथमिक माहितीनुसार, टेरेसवर ठेवलेल्या जुन्या वस्तू, कोरडा कचरा किंवा इलेक्ट्रिकल फॉल्टमुळे आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलाने सांगितले की आग कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे.
धूर वाढत असल्याने काही वेळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र अग्निशमन दलाने टेरेसपर्यंत पोहोचून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू केले. आग वेळीच नियंत्रित केल्यामुळे ती खालच्या मजल्यांपर्यंत पसरली नाही.
या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे सांगितले जात आहे. परिसरातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. सुदैवाने, आग लागली त्या वेळी इमारतीच्या टेरेसवर कोणीही नव्हते.
टेरेसवर ठेवलेल्या साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष नुकसान किती झाले याचा अंदाज घेतला जात आहे. अग्निशमन विभागाच्या मते, आग वेळेत विझवली नसती तर परिसरात मोठा स्फोट किंवा दुर्घटना होण्याची शक्यता होती.