TAIT Exam Result 2025: 'टीएआयटी' परीक्षेचा निकाल आज लागणार, या विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवणार
TAIT Result
पुणे : राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीचा निकाल आज सोमवारी (दि. 18) लागणार आहे. त्यामध्ये बी. एड. तसेच डी. एड.च्या 6 हजार 319 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा परीषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.
ओक यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकभरतीसाठी आवश्यक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी परीक्षेमध्ये उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता, त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत सादर करण्यासंदर्भात कळविण्यात आले होते. परीक्षेस एकूण 2 लाख 28 हजार 808 परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. त्यापैकी परीक्षेला एकूण 2 लाख 11 हजार 308 प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी बी.एड्. परीक्षेचे 15 हजार 756 आणि डी.एल.एड. परीक्षेचे 1 हजार 342 असे एकूण 17 हजार 98 उमेदवारांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरले होते.
दि. 14 ऑगस्ट अखेर बी.एड. परीक्षेचे 9 हजार 952 व डी.एल.एड. परीक्षेचे 827 अशा एकूण 10 हजार 779 उमेदवारांनी राज्य परीक्षा परीषदेला माहिती दिली. त्यांचा निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे; परंतु ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक राज्य परीक्षा परिषदेला अद्यापपर्यंत सादर केलेले नाही, अशा बी. एड्. परीक्षेचे 5 हजार 804 व डी.एल.एड्. परीक्षेचे 515 अशा एकूण 6 हजार 319 उमेद्वारांचा निकाल राखीव ठेवण्यात येईल.
तरी ज्या उमेदवारांनी अद्यापपर्यंत परीक्षा परीषदेच्या लिंकमध्ये दिलेल्या मुदतीत सादर केली नाही, अशा उमेदवारांनी दिलेल्या लिंकद्वारे माहिती सादर न केल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहिल. त्यानंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नसल्याचे राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

