Dada Bhuse meeting with education officers
पुणे: शिक्षण विभागातील काही प्रमुख अधिकार्यांनी मंगळवारी (दि.12) शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन चर्चा केली. यामध्ये शिक्षणमंत्र्यांनी महत्त्वाच्या मागण्यांवर चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सामूहिक रजा आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व शिक्षणसेवा राजपत्रित अधिकारी-कर्मचारी यांनी बुधवारपासून पूर्ववत कामावर रुजू व्हावे, असे आवाहन अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाने केले आहे.
संघटनेच्या पदाधिकारी व सर्व शिक्षणसंचालक, सहसंचालक, उपसंचालक यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांच्याबरोबर मंत्रालयात सकारात्मक चर्चा झाली. यामध्ये नागपूर विभागासह सर्व बोगस शालार्थ प्रकरणांची चौकशी विशेष चौकशी समितीकडे वर्ग करावी. (Latest Pune News)
विनाचौकशी कोणत्याही अधिकारी-कर्मचारी यांना नियमबाह्य अटक करू नये, शालार्थप्रकरणी निलंबित सर्व अधिकारी यांना सेवेत पुनर्स्थापित करण्यात यावेत. अतिरिक्त कामांचा ताण, कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त होणार्या व्हिडीओ कॉन्फरन्ससंदर्भातही चर्चा झाली. संघटनेच्या सर्व न्याय मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल. संघटनेच्या मागण्यांचे निवेदन पोलिस विभागाला देण्यात येणार आहे. कोणत्याही निरपराधावर चुकीची कारवाई होणार नाही, अशा प्रकारचे आश्वासन प्रशासनाकडून मिळाले.