पुणे : स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रोला मान्यता

पुणे : स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रोला मान्यता
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो मार्गाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली. 5.464 किलोमीटर लांबी आणि तीन स्थानके असलेल्या या मार्गासाठी तीन हजार 668 कोटी रुपये खर्च होतील. या भुयारी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महामेट्रो) मार्फत करण्यात येणार असून, तो एप्रिल, 2027 पर्यंत पूर्ण करण्यात येईल.

मेट्रो विस्तारीकरणासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असून, त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवडमधील सार्वजनिक वाहतुकीचे जाळे विस्तारणार आहे. पुणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा आणि पायाभूत सुविधा निर्मितीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

पुणे महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या विस्तारीत मार्गिकेचा हा पहिला टप्पा आहे. त्यासंदर्भात राज्यमंत्रिमंडळाने आज निर्णय घेतला. या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून अनुदानापोटी 450.95 कोटी रुपये, तसेच केंद्र व राज्य शासनाचे कर आणि शुल्क यांवरील खर्चासाठी बिनव्याजी दुय्यम कर्ज स्वरूपात 440.32 कोटी रुपये असा एकूण 891.27 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. पुणे महापालिकेकडून 450.95 कोटी रुपयांचे अनुदान आणि भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत व बांधकाम कालावधी दरम्यानचे व्याज याकरिता 204.14 कोटी रुपये असे एकूण 655.09 कोटी रुपये इतके वित्तीय सहाय्य महामेट्रोला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आणखी अनुसान मिळविण्यासाठी प्रयत्न

या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून 300.63 कोटी रुपये अनुदान मिळविण्यासाठी केंद्र शासनास विनंती करण्यात येणार आहे. या प्रकल्पाकरिता वित्तीय संस्थेमार्फत 1803.79 कोटी रुपयांचे अल्प व्याजदराचे कर्ज घेण्यास महामेट्रोला प्राधिकृत करण्यास मान्यता देण्यात आली. मात्र, या कर्जाचे मुद्दल, व्याज व इतर शुल्क यांचा कोणताही भार राज्य शासनावर येणार नाही, अशी अट घालण्यात आली आहे. स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गामुळे गुलटेकडी, मार्केट यार्ड, पद्मावती, बिबवेवाडी, धनकवडी, बालाजीनगर, साईबाबानगर, आंबेगाव या ठिकाणच्या नागरिकांना फायदा होणार आहे. त्याचबरोबर कात्रजपासून निगडीपर्यंत मेट्रो धावल्याने त्याचा फायदा पुणे व पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीतील नागरिकांना होणार आहे.

मेट्रोचा विस्तार

महामेट्रोतर्फे स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड महापालिका भवन तसेच वनाज ते रामवाडी या दोन मार्गांचे काम सुरू आहे. सध्या सुमारे 12 किलोमीटर अंतरावर मेट्रो धावू लागली आहे. पुढील वर्षाच्या अखेरीला हे दोन्ही मार्ग पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्याचवेळी हिंजवडी ते शिवाजीनगर या 23 किलोमीटर मेट्रो मार्गाचे काम खासगीकरणाच्या माध्यमातून सुरू आहे. तीन वर्षांत तो मार्ग पूर्ण होईल. पहिल्या मार्गाचा विस्तार निगडी ते कात्रज झाल्यास प्रवाशांना त्याचा फायदा होईल.

https://youtu.be/wimwsVNgHnY

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news