भूकरमापकांना वाढीव वेतनश्रेणी मिळालीच पाहिजे; 15 मेपासून आंदोलनाचा इशारा
Demand for salary increase
पुणे: भूमिअभिलेख विभागातील भूकरमापकांना रोव्हर, लॅपटॉप मिळावा. तांत्रिक वेतनश्रेणी लवकरात लवकर लागू करावी. यांसह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेच्या पुणे विभागाच्या वतीने 15 मेपासून आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, संघटनेच्या पदाधिकार्यांबरोबर उपसंचालक राजेंद्र गोळे यांनी बैठक घेतली असून, प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडवू, असे आश्वासन दिले आहे.
महाराष्ट्र राज्य भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेच्या पुणे विभागात कार्यरत असलेले भूकरमापक, शिरस्तेदार यांच्यासह इतर कर्मचार्यांच्या विविध मागण्या आहेत. या मागण्या अजूनही मान्य झाल्या नाहीत. ही बाब लक्षात घेऊन मार्च महिन्यात या संघटनेच्या वतीने भूमिअभिलेखच्या राज्य कार्यालयासमोर दोन दिवस आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर विभागाचे उपसंचालक गोळे यांच्याबरोबर चर्चाही झाली होती.
मात्र, त्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. त्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. याबाबत पुन्हा उपसंचालक राजेंद्र गोळे यांच्यासमवेत संघटनेचे पुणे विभाग अध्यक्ष विजय पिसाळ, सरचिटणीस अजित लांडे यांच्यासह पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीत प्रलंबित विषय मार्गी लावण्यात येतील, असे पदाधिकार्यांना आश्वासन दिले.
याबाबत सविस्तर माहिती देताना संघटनेचे पुणे विभाग सरचिटणीस अजित लांडे म्हणाले, या बैठकीत तांत्रिक वेतनश्रेणी द्यावी, अधिकार्यांचा आकृतिबंधास मंजुरी द्यावी, प्रत्येक भूकरमापकास रोव्हर आणि लॅपटॉप द्यावा, दहा वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनाचा 25 दिवसांचा पगार थकीत आहे तो देण्यात यावा, यांसह इतर मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. दरम्यान, 15 मेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास संघटनेच्या वतीने बेमुदत आंदोलन करण्यात येईल.

