

Chhatrapati Sambhaji Nagar special story
छत्रपती संभाजीनगर : 26 एप्रिल, 1993 ..कडक उन्हाळा..वेळ दुपारी एक वाजून 20 मिनिटांची..छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा विमानतळावरून बोइंग विमानाने मुंबईकडे उड्डाण केले..परंतु रनवे सोडल्यानंतर अपेक्षित उंची न गाठता आल्याने विमानाची चाके रस्त्यावर उभ्या असलेल्या कापसाच्या गंजीच्या ट्रकला धडकली आणि त्यामुळे वैमानिकाचे नियंत्रण सुटून वीज तारांना स्पर्श करीत विमान वरूड शिवारात (आता असलेल्या केंब्रिंज स्कूल परिसर) कोसळले.
या अपघातात विमानाचे तीन तुकडे होत 56 प्रवाशी मरण पावले, तर 63 बचावले. पण विमान दुर्घटनेच्या इतिहासात ट्रकला धडकून अपघात होण्याची ही पहिलीच वेळ. आपल्या ट्रकला विमान धडकून पुढे गेल्याचे चालकाने पाहिल्यावर त्याने तातडीने जवळचे एसटीडी, पीसीओ सेंटर गाठले आणि मालकाला अपघाताबाबत माहिती दिली. तेव्हा पलिकडून मालकाने विचारले, तू विमान चालवित होतास की ट्रक?
हे विमान (बोईंग 737) दिल्ली- जयपूर- उदयपूर मार्गे चिकलठाणा विमानतळावर आले होते. विमान उतरल्यानंतर इंधन भरेपर्यंत वैमानिक कॅ. एस. एन. सिंग आणि सहकारी मनिषा मोहन, अन्य कर्मचारी फ्रेश होण्यासाठी बाहेर आले होते. संभाजीनगरातून चढलेल्या प्रवाशांचे हवाई सुंदरी स्वागत करीत होती. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर दुपारी एकच्या सुमारास विमान उड्डाणासाठी सज्ज झाले.
वैमानिकाला ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर विमानाने उड्डाण केले खरे. परंतु, वैमानिकाला अपेक्षित उंची गाठता आली नाही. बीडकडे जाणार्या मार्गावर वाहतूक सुरू होती आणि कंपाऊड नजीक असणार्या रस्त्यावर कापसाची गंजी असणारा ट्रक उभा होता. ट्रक चालकाने विमान उडते कसे हे कधी पाहिले नव्हते, त्याला जवळून पाहण्याची संधी पहिल्यांदाच मिळाली. पण विमान वर जात असताना त्याची चाके कापसाच्या गंजीला लागल्यामुळे वैमानिकाचे नियंत्रण सुटले व पुढे हाय होल्टेज तारांना स्पर्श करीत वरूड दांडगे शिवारात कोसळले. क्षणभर प्रवासी आणि विमान कर्मचार्यांनाही काय झाले हे कळाले नाही. विमान कोसळल्यानंतर त्याचे तीन तुकडे झाले आणि आग लागली. अचानक झालेल्या अपघातामुळे विमानात धूर झाला, पुढील बाजुने बसलेल्या प्रवाशांनी पटापट बाहेर उड्या घेतल्या. पण पाठीमागील प्रवासी आग आणि धुरामुळे अडकले व त्यांचा कोळसा झाला. व्हिडिओकॉनचे संस्थापक नंदलाल धूत, अरूण जोशी, पी. यू. जैन, हॉटेल गुरूचे मालक जवाहरानी, मुनोत, व्ही. ए. जाधव आदींचा त्यात समावेश होता. जिंतूरचे तत्कालिन आमदार रामप्रसाद बोर्डीकर, गरवारे कंपनीचे तत्कालिन तांत्रिक संचालक अनिल भालेराव, अरूण मुगदीया, अनिल माछर आदी प्रवासी सुदैवी ठरले. ते या घटनेतून बालंबाल बचावले. तत्कालिन पोलिस आयुक्त चरणसिंग आझाद, उपायुक्त इधाटे, उपजिल्हाधिकारी दिलीप शिंदे आदींनी अपघातस्थळी धाव घेतली.
या अपघाताची माहिती कळताच मुख्यमंत्री शरद पवार, केंद्रीय नागरी उड्डान मंत्री गुलाब नबी आजादतातडीने शहरात दाखल झाले व त्यांनी अपघातस्थळाची पाहणी केली. तेव्हा लोकसभेचे अधिवेशन सुरू होते. विमानतळावर नाइट लँडींगची सुविधा नव्हती. पर्यायाने धावत-पळत दौरा करून दुसर्या दिवशी आझाद यांनी सभागृहाला अपघाताची माहिती दिली.
विमानतळाचा रन वे छोटासा होता. तसे म्हटले तर आतासारखे विमानतळ नव्हते. अगदी जालना रस्त्यावरून येणार्या जाणार्यांनाकंपाऊंडची उंची जास्त नसल्याने विमान दिसत असे. कंपाऊंडला लागूनच बीडकडे जाणारा रस्ता होता. विमान येण्या-जाण्याची वेळ झाली की बीड रस्ता बंद होत असे. पण हा संकेत दुर्घटनेपूर्वी काही महिने अगोदरपासून पाळल्या जात नव्हता. परिणामी, विमानाने उड्डाण घेतल्यानंतर विमानाची चाके ट्रकमध्ये असणार्या गंजीला धडकली, हे प्राथमिक कारण सांगितले गेले. याशिवाय तापमान पाहता विमानात लोड मर्यादित ठेवणे गरजेचे होते. पण प्रवाशांच्या सामानाचे वजनही जास्त होते. विमान ट्रकला धडकणार हे वैमानिक सिंग यांच्या लक्षात आले, त्यांनी तांत्रिक कौशल्य वापरून विमानाला काही होणार नाही, याची काळजी घेतली. तोपर्यंत वेळ टळून गेली होती. विमानाची चाके आत घेण्यापूर्वीच ट्रकला लागली आणि दोन मिनिटाच्या अंतरावर असणारा हाय टेन्शन पॉवर लाईनला स्पर्श करीत विमान कोसळले. तेव्हा ही लाईन बंद होती म्हणून बरे झाले, नाहीतर अपघात कसा झाला असता याची कल्पनाच न केलेली बरी. वैमानिक, सहवैमानिक अपघातातून बचावले. पुढे त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. पण नंतर काय कारवाई झाली, याचे कोडे अद्यापही उलगडले नाही.
अपघात झाल्याची माहिती विमानतळावरील नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर धावाधाव सुरू झाली. फायर ब्रिगेड पोहोचेपर्यंत काही प्रवासी बाहेर आले होते. पण आतमध्ये अडकलेल्यांना मागील दरवाजा बंद राहिल्यामुळे संधी मिळाली नाही. व्हॉटसअॅप, चॅनलचा तो जमाना नव्हता. काही घरांमध्ये लँडलाईन दाखल झाले होते. त्यामुळे अपघाताची माहिती हस्ते परहस्ते मिळत गेली. सुरुवातीला लोक जमेल तसे मदतीला लागले. नंतर प्रशासनाने नियंत्रण मिळविले. संध्याकाळी तर अपघातस्थळी दहा हजारावर लोक जमा झाले. कारण विमानाला अपघात होण्याची ही पहिलीच वेळ होती. अपघाताला कारण ठरलेल्या ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याची जबानी नोंदविण्यात आली. त्यात मालक आपणास ट्रक चालवित होता की विमान असे म्हणाल्याचे चालकाने पोलिसांना सांगितले.
सरकारने अपघाताची चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. एस. एच. मोहता यांची नियुक्ती केली. या अपघातास आयोगाने वैमानिकाला जबाबदार धरले. वैमानिकाने जास्त वेळ विमान थांबविले तसेच चुकीच्या रोटेशन पद्धतीचा अवलंब केला. त्याची ही कृती बेपर्वाईची असल्याचे न्यायमूर्तींनी नमूद केले. विमानतळाजवळ रस्ता कसा काय हा प्रश्नही न्यायमूर्तींनी उपस्थित केला. 1975 ते 85 या काळात रस्ता वाहतूक रोखण्यासाठी गेट होते, नंतर ही व्यवस्था काढून टाकण्यात आली. अपघात होण्यापूर्वी वर्षभर अगोदरपासून विमान ये जा करताना वाहतूक बिनधास्तपणे चालू असे, असे यासंबंधीच्या अहवालात म्हटले आहे. इंडियन एअरलाइन्स, विमानतळ प्राधिकरण यांची याबाबतची वृत्ती उदासीन आणि निर्दयी असल्याचे सांगत हा अपघात अविश्वसनीय होता, असा शेरा त्यांनी मारला.
या अपघातातून बचावलेले अनिल भालेराव म्हणाले, अरूण जोशी या मित्रासोबत आपण मुंबईकडे निघालो होतो. मित्राचा या अपघातात दुर्दैवाने मृत्यू झाला. याचि देही याचि डोळा अनुभवलेला प्रसंग 32 वर्षांनंतरही डोळ्यासमोरून जात नाही. त्यातच मित्राचे जाणेही आजही मनाला अस्वस्थ करते. त्यामुळे अपघाताचा तो क्षण कधीही विसरू शकणार नाही, असे ते म्हणाले. अपघातानंतर विमानतळ विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आला. धावपट्टीची लांबी वाढवण्यात आली. अपघात झालेला परिसर ताब्यात घेऊन थोड्या फार प्रमाणात विस्तारीकरणही केले. मात्र सुरक्षा आणि मोठ्या विमानाच्या संचालनांसाठी 137 एकरचे गरज असलेले भूसंपादन रखडल्याने भूसंपादनाचे काम थंडावले आहे. यामुळे विस्तारीकरणांसाठी मदत करणार्या शेतकर्यांनाही अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
विमान अपघातानंतर विमानतळावर अनेक खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या. रन वेची लांबी वाढवण्यात आली आहे. तसेच विमानतळांवर लागणारे लँडिग इन्स्ट्रुमेंटल सुविधा उपलब्ध केल्या आहेत. मात्र भूसंपादनामुळे रखडलेल्या विस्तारीकरणांमुळे आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होऊनही पाहिजे तेवढे विमाने येत नाहीत. त्या संबंधाची पुढील कारवाई सुरू असून लवकरच या सुविधाही प्राप्त होतील, अशी माहिती विमानतळ प्राधिकरण निदेशक शरद येवले यांनी दिली.
भूसंपादन करण्यासाठीस परिसरातील जमीनीवर आरक्षण टाकून ठेवण्यात आले आहे. 137 एकरच्या भूसंपादनाचा प्रश्न अद्यापही मार्गी लागला नाही. हा प्रश्न तात्काळ मार्गी लागला तर शेतकर्यांना पुढील निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा होतो. शेतकर्यांना जमिनीचा मोबदला मिळाला असला तरी निहान आणि शिर्डी विमानतळाप्रमाणे बाधित शेतकर्यांना सोयी सुविधा देण्यात विमानतळ प्राधिकरण हालचाल करत नाही. पाल्यांना नोकरी, इतर सुविधा याबर अद्यापही निर्णय झाला नाही, असे शरद पवार गटाचे नेते बापूसाहेब दहिहंडे म्हणाले.